नांदेड(प्रतिनिधी)- बिलोली न्यायालयात न्यायाधीशांनी मी गाय ही आमची आई आहे, आम्ही तिला देव मानतो, हे सर्व काम सोडा मी जोपर्यंत बिलोलीत आहे, तोपर्यंत तुमची खैर नाही, तुमची जामीन दोषारोपत्र दाखल होईपर्यंत कशी होते, मी यापुर्वीच्या स्टेशनमध्ये असताना खूप लोकांना शिक्षा दिल्या आहेत, अशा धमक्या बिलोलीचे न्यायाधीश विशाल घोरपडे यांनी खुल्या न्याय दालनात माझे वकील व पक्षकारांसमक्ष दिल्या असल्याची तक्रार सय्यद सोहेल सय्यद फारूख यांनी नांदेडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाधीशांकडे शपथपत्रासह दाखल केली आहे.
सय्यद सोहेल सय्यद फारूख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते बळेगाव ता. उमरी येथील रहिवाशी आहे आणि सध्या ते लेबर कॉलनी नांदेड येथे राहतात. बिलोली येथे सन 2024 मध्ये दाखल झालेल्या गुन्हा क्र. 346, 292 आणि 302 मध्ये ते आरोपी आहेत. या तिन्ही गुन्ह्यांशी माझा काही संबंध नाही. मला सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवले आहे. माझा मामे भाऊ सय्यद सैफ सय्यद कैसर रा. ईनामदार गल्ली बिलोली हा 20 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्रीनंतर म्हणजे 21 डिसेंबर 2024 रोजी रात्री 2.37 वाजता ते माझ्या घरात होते. पण ते बिलोलीमध्ये हजर होते असे त्यावेळी दाखवण्यात आले. गुन्हा क्र. 302 मध्ये जिल्हा न्यायाधीश बिलोली यांनी मला जामीन मंजूर केला. त्याची अनुपालना करण्यासाठी बिलोली न्यायालयात गेलो असताना 10 जानेवारी 2025 रोजी न्यायाधीश विशाल घोरपडे यांनी खुल्या न्यायालयात मला माझे भाऊजी मिर्झा लायक बेग यांना सांगून धमक्या दिल्या.
इतर दोन गुन्ह्यांमध्ये तपासीक अंमलदाराने न्यायालयीन कोठडीचा अर्ज सादर केला तेव्हा पीसीआर मागत नाही का असे म्हणून त्यांच्यावर पण चिडले. गुन्हा क्र. 346 मध्ये मला सात दिवसांचा पीसीआर दिला. हा सर्व धार्मिक प्रवृत्तीचा विचार करून दिला होता, असा आरोप केला आहे. या प्रकरणांमध्ये काही जप्ती नाही, मला सूडबुद्धीने पीसीआर दिला होता. सय्यद सोहेलच्या आरोपाप्रमाणे न्यायाधीश विशाल घोरपडे यांच्या न्यायदालनात व निजी कक्षात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तसेच गोरक्षकांच्या बैठका झाल्या आहेत. विशाल घोरपडे यांच्या न्यायालयात सीसीटीव्ही आहेत, त्याची चौकशी व्हावी म्हणजे सत्य कळेल. मला दि. 11 मार्च 2025 रोजी जामीन मिळाला आहे. मी जानेवारीपासून बिलोली न्यायालयीन कोठडीत होतो. मी जर त्यांच्या विरोधात अर्ज दिला तर बिलोली न्यायाधीशांची ते दिशाभूल करतील म्हणून मी घाबरून गेलो होतो. मला बिलोली न्यायालयात दिलेल्या धमक्या बिलोली न्यायालयातील कर्मचारी, वकील व इतर पक्षकारांनी पाहिल्या आहेत.
तरी मेहेरबान साहेबांनी बिलोली न्यायाशील विशाल घोरपडे यांच्या न्यायालयात असलेले सीसीटीव्ही तपासावे, त्यांच्या निजी कक्षात कोण-कोण येतात याची चौकशी करावी आणि माझ्याविरूद्धचे खटले त्यांच्याऐवजी दुसऱ्या न्यायालयात वर्ग करावेत अशी विनंती केली आहे. हा अर्ज नांदेडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाकडे दि. 15 मार्च 2025 रोजी दिला आहे.
Leave a Reply