उद्या रामनवमी निमित्त शोभायात्रा ; नागरिकांनी बंद रस्ते पाहूनच उद्याचा प्रवास ठरवावा 


नांदेड (प्रतिनिधी)- श्री रामनवमी जन्मोत्सवानिमित्त २६ मार्च २०२६ रोजी नांदेड शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे.

 

ही शोभायात्रा शास्त्री मार्केट, जुना मोंढा, महावीर चौक, वजिराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर, आयटीआय चौक, वर्कशॉप कॉर्नर मार्गे अशोकनगर येथील हनुमान मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

 

२६ मार्च रोजी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहेत. बर्की चौक ते वर्कशॉप कॉर्नरपर्यंतचा मुख्य मार्ग, तसेच सिडको-हडको-नवीन पूल मार्गे जुना मोंढाकडे येणारी वाहतूक बंद राहील. याशिवाय पावडेवाडी नाका ते शासकीय विश्रामगृह आणि गोवर्धन घाट पुलावरून वजिराबाद चौकाकडे येणाऱ्या वाहनांवरही निर्बंध असणार आहेत.

 

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करून उत्सव शांततेत व सुरक्षिततेत साजरा करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post Views: 19






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *