लोहोणेर विद्यालयात 150 विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक आकाशकंदील:कागद, कापड, दोरे वस्तूंचा वापर करून साकारले आकाशकंदील‎

महाराष्ट्र




दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लोहोणेर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या लोहोणेर जनता विद्यालयात ‘आमची शाळा, आमचे उपक्रम’ या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा उत्साहात झाली. या कार्यशाळेत १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून आकर्षक आकाशकंदील साकारले. मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के व पर्यवेक्षक विलास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कलाशिक्षक अनिल शिरसाठ, साधना साळुंखे आणि सोनाली धोंडगे यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. कागद, कापड, दोरे तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करून कमी खर्चात सुंदर आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तू कशा तयार करता येतात, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध आकार, रंगसंगती आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून आकाशकंदील तयार केले. स्वतःच्या हातांनी कलाकृती साकारताना विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच त्यांच्यात सर्जनशीलता, हस्तकौशल्य आणि संघभावना विकसित होण्यास मदत झाली. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षकवृंदाने सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये हस्तकलेची आवड वाढण्यासाठी उपक्रम सण साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. उपलब्ध साहित्याचा पुनर्वापर करून सजावटीच्या वस्तू तयार केल्यास पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांतून कमी खर्चात आकर्षक निर्मिती करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण व्हावी, हस्तकलेची आवड वाढावी आणि उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करण्याची सवय लागावी, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry