![]()
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील मुदखेडमधील एका गुरुद्वारा परिसरात गुरुवारी ६२ वर्षीय निहंग शिखाने छोट्या तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यात त्यांच्या उजवा हात आणि खांद्याला दुखापत झाली. बादल यांना वाचवताना एक सुरक्षा रक्षकही जखमी झाला. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली. पोलिसांसह एटीएसही तपास करत आहे. सुखबीरसिंग बुधवारपासून पत्नी खासदार हरसिमरत कौर यांच्यासह नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी त्यांनी तख्त श्री हजूर साहिब येथे दर्शन घेतले. त्यानंतर ते कुटुंबासह नांदेड शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील गुरुद्वारा मातासाहिब देवान जी मुगट येथे आले होते. तेथून दर्शन घेऊन बाहेर पडताना हल्ला झाला. विशेष सुरक्षा पथकातील पोलिस अधिकारी संतोष केंद्रे यांनी बादल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, ज्यात केंद्रे यांनाही दुखापत झाली. बादल आणि सुरक्षा रक्षकास तत्काळ नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बादल यांच्या हातावर २ ते ३ टाके पडले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे, असे सांगत अकाली दलाच्या प्रवक्त्यांनी या हल्ल्याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झाला होता गोळीबार सुखबीरसिंग बादल यांच्यावर ४ डिसेंबर २०२४ रोजी अमृतसर येथील सुवर्णमंदिर प्रवेशद्वारावर गोळीबार झाला होता. अकाल तख्तने दिलेल्या धार्मिक शिक्षेनुसार बादल सेवादार म्हणून बसले असताना नरैनसिंग चौरा या माजी दहशतवाद्याने त्यांच्यावर हल्ला केला. सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेने गोळी भिंतीला लागून बादल बचावले होते. हल्लेखोर पुण्याचा वकील; म्हणाला, ‘मला वाटले म्हणून हल्ला केला’ जसपालसिंग (६२) असे या हल्लेखोराचे नाव आहे. हल्ला करतेवेळी तो निहंगाच्या वेशात तेथे उपस्थित होता. मला वाटले म्हणून मी हल्ला केला, अशी उद्दाम प्रतिक्रिया जसपालसिंगने पोलिस चौकशीत दिली. जसपालसिंग मूळचा पुण्याचा असून तेथील न्यायालयात वकिली करायचा. गेल्या २ वर्षांपासून नांदेडजवळील मुगट येथील मातासाब गुजरी गुरुद्वारात तो सेवा देत आहे. प्राथमिक चौकशीत त्याने पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येचा उल्लेख केला. मात्र, हल्ल्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तपासात महाराष्ट्र एटीएसही सहभागी झाली आहे. झेड प्लस असूनही हल्ला ही यंत्रणेची चूक झेड प्लस सुरक्षेमुळे सुखबीरसिंग यांच्याभोवती १० जवानांचे सुरक्षा कडे असते. झेड प्लस सुरक्षेतील व्यक्तीच्या दौऱ्यापूर्वी दोन दिवस आधी त्या परिसराची तपासणी केली जाते. सुरक्षेची खात्री पटल्यानंतर दौरा केला जातो. तरीही हल्ला होणे ही यंत्रणेची चूक दिसते. -नागनाथ कोडे, नि. स. पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर मोदींकडून फोनवर विचारपूस, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश: पंतप्रधान मोदींनी हरसिमरत कौर यांना फोन करून बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी नांदेड पोलिस अधीक्षकांना हल्ल्याच्या हेतू तपासाचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री शिंदेंनीही हरसिमरत कौर यांच्याकडे विचारपूस केली. पंजाब विधानसभेसाठी भाजपशी वाढली होती बादल यांची जवळीक अनेक वर्षे पंजाबमध्ये बादल कुटुंबीयांच्या शिरोमणी अकाली दल पक्षाची भाजपसोबत युती होती. शेतकरी कायद्याला विरोध करत सुखबीरसिंग बादल यांनी युती तोडली होती. आता पंजाबमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेसाठी पुन्हा युती होण्याची चर्चा आहे. त्यामुळे बादल यांची भाजपशी जवळीक वाढली आहे.
नांदेडात अकाली दल अध्यक्ष बादल यांच्यावर निहंगाचा तलवारीने हल्ला:बादल यांच्या हाताला 3 टाके, 62 वर्षीय हल्लेखोर अटकेत
