दिवंगत संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांनी आपल्या संगीताने, लोकप्रिय गीतांनी आणि अनोख्या शैलीने अनेक दशकांपर्यंत संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. भारतीय संगीत क्षेत्राला वेगळी ओळख देणाऱ्या बप्पी लाहिरी यांच्या गाण्यांचा प्रभाव देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचला. आजही त्यांची अनेक गाणी तितक्याच उत्साहाने ऐकली जातात. त्यांचे जीवन, संगीत आणि त्यांनी निर्माण केलेला समृद्ध वारसा पुढील अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील अंधेरी येथील जुहू परिसरात दिवंगत संगीतकार व गायक बप्पी लाहिरी यांच्या निवासस्थानाजवळील मार्गाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. या नामकरण सोहळ्याला चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, अभिनेते जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ गायक उदित नारायण यांच्यासह चित्रपटसृष्टीतील कलाकार, संगीत क्षेत्रातील मान्यवर, बप्पी लाहिरी यांचे कुटुंबीय आणि त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नामकरणाच्या माध्यमातून बप्पी लाहिरी यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाला उजाळा देण्यात आला. अनेक पिढ्यांच्या आयुष्यात संगीताच्या माध्यमातून आनंद निर्माण केला बप्पी लाहिरी यांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बप्पीदा हे केवळ लोकप्रिय संगीतकार आणि गायक नव्हते, तर त्यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून अनेक पिढ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. त्यांच्या गाण्यांमध्ये वेगळेपणा, उत्साह आणि नावीन्य होते. त्यांनी संगीतविश्वात अनेक नवे प्रयोग केले आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या संगीताची शैली इतरांपेक्षा वेगळी होती. लोकप्रिय चित्रपटगीते, ठेका धरायला लावणारे संगीत आणि लक्षात राहणाऱ्या चाली यांमुळे त्यांनी संगीत रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. त्यांच्या गाण्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही लोकप्रियता मिळवली. त्यामुळे त्यांचे संगीत हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. परदेशातही बप्पी लाहिरी यांच्या गाण्यांची लोकप्रियता बप्पी लाहिरी यांच्या संगीताची लोकप्रियता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. देशाबाहेरील अनेक ठिकाणीही त्यांच्या गाण्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषतः रशियन फेडरेशनमध्येही त्यांची गाणी आज ऐकली आणि गायली जातात, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. भारतीय चित्रपटसंगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात बप्पी लाहिरी यांच्यासारख्या कलाकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या संगीताने भाषेच्या सीमा ओलांडत विविध देशांतील रसिकांशी नाते जोडले. त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता आजही कायम असल्याने त्यांच्या संगीताचा प्रभाव किती व्यापक होता, हे स्पष्ट होते. मार्गाच्या नामकरणातून संगीतकाराच्या कार्याचा गौरव आजचा कार्यक्रम केवळ एका मार्गाच्या नामकरणापुरता मर्यादित नाही, तर बप्पी लाहिरी यांच्या समृद्ध जीवनाचा आणि संगीतप्रवासाचा गौरव करणारा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यांच्या गाण्यांचे स्मरण करणे म्हणजे एका संगीतमय प्रवासाला पुन्हा उजाळा देण्यासारखे आहे. त्यांच्या आठवणी जाग्या होताच त्यांची असंख्य लोकप्रिय गाणीही मनात पुन्हा रुंजी घालू लागतात. बप्पी लाहिरी यांच्या नावाने मार्गाचे नामकरण करण्याची संधी मिळणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. या नामकरणामुळे त्यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाच्या स्मृती जतन होतील. तसेच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कार्याची आठवण होत राहील आणि नव्या पिढीलाही त्यांच्या संगीताचा वारसा जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. स्मृती जपण्याचा आणि संगीतवारसा पुढे नेण्याचा प्रयत्न कलाकाराचे कार्य काळाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या स्मरणात कायम राहते. बप्पी लाहिरी यांनी आपल्या संगीताने निर्माण केलेली लोकप्रियता आणि रसिकांच्या मनात मिळवलेले स्थान यामुळे त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांच्या नावाने मार्गाचे नामकरण करणे हा त्यांच्या कलात्मक योगदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न आहे. बप्पी लाहिरी यांच्या संगीताचा ठसा भारतीय चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ कायम राहणार असून, त्यांची गाणी संगीतप्रेमींना आनंद देत राहतील. त्यांच्या जीवनप्रवासातून आणि संगीतक्षेत्रातील योगदानातून आगामी पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. हेही वाचा… ‘आमचा विजय मुश्रीफांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता’:गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांसह महायुतीला टोला, फेरमतमोजणीवरूनही सुनावले गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलने 13 जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. या निकालानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आमचा जो विजय झालेला आहे, तो मुश्रीफ साहेबांनी आणि चंद्रदीप नरकेंनी खिलाडूवृत्तीने स्वीकारायला पाहिजे होता. जो पराभव झालेला आहे, तोही त्यांनी स्वीकारायला पाहिजे होता,’ असे म्हणत सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला. फेरमतमोजणीच्या अर्जामुळे निकाल जाहीर होण्यास जवळपास 3 तासांचा विलंब झाल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता असून, त्याचे निर्णय कोल्हापुरातच झाले पाहिजेत, ही आमची भूमिका दूध उत्पादकांना पटली, असा दावाही त्यांनी केला. सविस्तर वाचा….
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%