ज्येष्ठ नागरिकाची 28 लाखांची फसवणूक:आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून गंडा




पुणे, प्रतिनिधी: आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २८ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगाव परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदाराने एक आयुर्विमा पॉलिसी काढली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि पॉलिसीचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवले. चोरट्यांनी त्यांना पॉलिसीची रक्कम परत मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगितले. तसेच, विविध प्रकारचे कर भरल्यानंतर पॉलिसीची संपूर्ण रक्कम व्याजासह मिळेल, असेही त्यांना सांगण्यात आले. वेगवेगळी कारणे देत चोरट्यांनी त्यांना वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. या आमिषाला बळी पडून ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांच्या खात्यात एकूण २८ लाख ३८ हजार रुपये जमा केले. पॉलिसीचे पैसे परत न मिळाल्याने त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास कोडग या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, सायबर चोरट्यांनी आणखी एका व्यावसायिकाची १० लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या तक्रारदार व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांना स्वस्तात लिथियम बॅटरी देण्याचे आमिष दाखवून बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. या आमिषाला बळी पडून व्यावसायिकाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *