
हिंगोली शहरात दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या परळी येथील राजस्थानी मल्टिस्टेट कॉपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीकडे जिल्ह्यातील खातेदारांच्या सुमारे ५ कोटींच्या ठेवी अडकल्या असून आता या ठेवी मिळाव्यात यासाठी खातेदारांनी मंगळवारी ता. १६ जिल्हा प्रशासनाकडे धा
.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथील राजस्थानी मल्टिस्टेट कॉपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची परळी वैजनाथ यांची हिंगोली शहरात सन २०२३ मध्ये शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेत जास्तीत जास्त ठेवी मिळाव्यात या उद्देशाने पतसंस्थेच्या संचालकांनी हिंगोली शहरातील काही जणांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर हिंगोलीत भव्यदिव्य कार्यक्रम घेऊन शाखा सुरु केली होती. यावेळी उपस्थित अध्यक्ष व संचालक मंडळांनी पतसंस्थेच्या ४० ठिकाणी शाखा असल्याचे सांगत ठेवीवर १२ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर शहरातील व्यापारी वर्गाशी संपर्क साधून त्यांना ठेवी ठेवण्याचा आग्रह केला.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरीक व व्यापाऱ्यांनी सुमारे ५ कोटी रुपयांच्या ठेवी या ठिकाणी ठेवल्या होत्या. त्यानंतर ठेवीची मुदत संपल्यानंतर खातेदारांनी पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र त्यांना सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिंगोलीच्या कार्यालयाला कुलुप ठोकून पोबारा केला.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांनी परळी वैजनाथ येथील संचालकांसोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणासोबतही संपर्क झाला नाही. त्यानंतर आज खातेदार दीपक अग्रवाल, आनंदा बोरसे, अनंत कुमार चांडक, मुरलीधर मुंदडा, यादव डाखोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्याकडे निवेदन देऊन आमची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.