मी पूर्णेकरांची केस लढू नये म्हणून शिंदेकडून प्रयत्न होईल:शिंदेंची ताकद कितीही असली, तरी संविधानाची पॉवर मोठी- गुणरत्न सदावर्ते




ठाणे आता पूर्वीसारखे शांत राहिलेले नाही. प्रदीप पूर्णेकर आणि पोलिस अधिकारी भोईर यांची हत्या होते, तर कल्याणमध्ये जागेसाठी बौद्ध भिक्षूंना विस्थापित केले जाते. या सर्व घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला पाहिजे, असा जोरदार निशाणा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी साधला आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची केस मी स्वतः लढायला तयार आहे. मात्र, मी ही केस लढू नये म्हणून ठाण्याचे पालकमंत्री शिंदे यांच्याकडून पूर्ण प्रयत्न केले जातील, हे मी न घाबरता सांगतो आहे. राजकारण्यांची कोणतीही टोळी नसून तो पक्ष असावा, पण आज पक्षाची जणू टोळीच झाली आहे. नाशिकमध्ये उदय सामंत यांच्याविरोधात किती तक्रारी करण्यात आल्या होत्या? ठाकूरवाडीत प्रताप सरनाईकांनी काय प्रकार केले, हे सर्वांनाच माहीत आहे. एकनाथ शिंदेंचा नेमका ड्रीम प्रोजेक्ट काय आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. बौद्ध भिक्षूंचे काय झाले, हेही आपण पाहिले आहे. पूर्णेकर कुटुंबियांनी दबावाला बळी पडू नये ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, त्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. एकनाथ शिंदेंची ताकद कितीही असली, तरी संविधानाची ताकद त्याहून कैकपटीने जास्त आहे. पूर्णेकर कुटुंबीयांना आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे. मात्र, मी वकील होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. एवढेच नव्हे तर, अशा मुद्द्यांवर उघडपणे बोलत असल्यामुळे माझी किंवा जयश्री पाटील यांचीही हत्या घडवली जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील विकासासंदर्भात एक श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही त्यांनी केली. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर बोलताना ॲड. सदावर्ते म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत निष्पक्ष आणि योग्य तपास करणे गरजेचे आहे. मात्र, जर मुख्य आरोपींची नावेच एफआयआरमध्ये टाकलेली नसतील, तर हा कसला तपास सुरू आहे? असा सवाल त्यांनी केला. पूर्णेकर कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही अडवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसंदर्भातील नावे पुरवणी जबाबात येतात, तोपर्यंत ती मुख्य गुन्ह्यात सामाविष्ट केली जात नाहीत. पुरवणी जबाबात नावे आल्यानंतरही अद्याप संबंधित व्यक्तींना आरोपी करण्यात आलेले नाही, हे पूर्णपणे कायदाबाह्य आहे. खऱ्या आरोपींची नावे गुन्ह्यात समाविष्ट करणे आवश्यक असून या खुनाचे मूळ कारण सर्वांसमोर आले पाहिजे. नेते स्वत:ला मालक समजू लागले की असे होते ॲड. सदावर्ते म्हणाले की, एकनाथ शिंदे नेहमी मोठेपणाने सांगतात की मी रिक्षा चालवत मोठा झालो; पण आज त्यांच्यासारखे किती रिक्षावाले भाऊ आलिशान बंगल्यात राहतात? तसेच, दुसरे एक नेते सांगतात की मी भुर्जी विकली; पण आज त्यांच्या उंचीवर किती भुर्जीवाले पोहोचले? असे म्हणत त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार तोफ डागली. राजकारणी लोक जेव्हा स्वतःला मालक किंवा राजा समजायला लागतात, तेव्हाच अशा प्रकारच्या हत्या होण्यास सुरुवात होते, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *