![]()
भविष्यातही सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे सातत्य राखण्याबरोबरच गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हेच साई संस्थानचे प्रमुख ध्येय आहे, असे प्रतिपादन साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी केले.
.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी आणि ग्लोबल किडनी स्टोन फाउंडेशन, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप झाला. या शिबिरात एकूण ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ५२ गरजू रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमामुळे परिसरातील शेकडो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शिबिराचा समारोप सोमवारी श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम), शिर्डी येथे झाला. त्यावेळी दराडे बोलत होते.यावेळी ग्लोबल किडनी स्टोन फाउंडेशनचे डॉ. केतन शुक्ला, अमेरिकेहून आलेले शशांक पाशुमार्थी, साई संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक, उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे उपस्थित होते. शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर शस्त्रक्रिया पार पडल्या. श्री साईनाथ रुग्णालयातील डॉ. राम नाईक, डॉ. विद्या बोराडे, डॉ. महेंद्र तांबे, डॉ. मिलाप, डॉ. विनय, डॉ. दीपक नजन, डॉ. पल्लवी जगताप, डॉ. प्राजक्ता बनकर, अधीसेविका नजमा सय्यद तसेच नर्सिंग स्टाफ व जनरल सर्जरी विभागातील कर्मचाऱ्यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरादरम्यान डॉक्टरांनी किडनी स्टोन होण्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि पुरेसे पाणी पिण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे यांनी केले, तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले.
साईबाबा संस्थानची रुग्णालये गोरगरीबांसाठी आधारवड शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानची रुग्णालये राज्यातील गोरगरीब रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहेत. साईबाबांच्या “सबका मलिक एक” आणि “श्रद्धा व सबुरी” या संदेशाप्रमाणे रुग्णसेवा हेच खरे ईश्वरसेवेचे रूप मानून संस्थान कार्य करत आहे. गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. साईचा रुग्णसेवेचा वसा अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी साईसंस्थान दरवर्षी कोट्यवधींचा निधी आरोग्यसेवेवर खर्च करते. आधुनिक यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि सर्वसमावेशक उपचार सुविधा यामुळे शिर्डीची रुग्णालये रुग्णांसाठी विश्वासार्ह आरोग्यकेंद्र बनली आहेत.गरीब, शेतकरी, मजूर आणि दुर्गम भागातील रुग्णांना येथे नवजीवन मिळत असून “रुग्णसेवा हीच साईसेवा” हा मंत्र संस्थान साकार करत आहे.
