![]()
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘विज्ञान प्रेरणा अभियान’ अंतर्गत राज्यातील विविध ‘विजाभज’ आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे सहादिवसीय विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीसाठी पुण्याहून विमानाने रवाना झाले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञानाचे ज्ञान मिळवावे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले. या विद्यार्थ्यांची निवड गुणवत्ता परीक्षेद्वारे करण्यात आली आहे. २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयोजित या सहलीसाठी मंत्री अतुल सावे यांनी लोहगाव विमानतळावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक प्रशांत शिर्के, प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड, सहायक संचालक प्रदीप संकपाळ, सीआयएसएफचे वरिष्ठ कमांडट प्रताप पुंडे आणि आश्रमशाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री सावे यांनी सांगितले की, या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना इस्रो येथे उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रत्यक्ष रॉकेटचे प्रक्षेपण पाहणे आणि अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी थेट माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. विज्ञानविषयक कार्यशाळा आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधून त्यांना अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ घेता येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांशी जोडणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विभागामार्फत असा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. पुढील वर्षी अधिक विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असेही मंत्री सावे यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी या भेटीच्या अनुभवावर आधारित निबंध लिहावेत, त्यातून उत्कृष्ट निबंधाला बक्षीस दिले जाईल. ग्रामीण भागातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी वस्तीगृह, २४ तास सौरऊर्जेवर वीज आणि कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
विजाभज आश्रमशाळेचे 100 विद्यार्थी इस्रो भेटीसाठी रवाना:अंतराळ विज्ञानाचे ज्ञान मिळवून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवावा: मंत्री सावे
