जायखेडा–ताहाराबाद रस्त्यावरील माती हटविली:सलग तीन दिवस काम बंद पाडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग‎




छत्रपती संभाजीनगर ते अहवा राज्य महामार्ग २० वरील जायखेडा–सोमपूर–ताहाराबाद दरम्यानच्या रस्ता कामात निकृष्ट मातीमिश्रित मुरूम वापरला जात असल्याचे उघडकीस आल्याने सोमपूर ग्रामस्थांनी सलग तीन दिवस काम बंद पाडत ग्रामस्थांनी कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुस्त कारभाराचा निषेध केला. अखेर चौथ्या दिवशी अधिकाऱ्यांनी माती हटवण्याचे आणि ‘प्लॅन एस्टीमेट’ दाखवण्याचे आश्वासनानंतर तोडगा निघाला. कामाची दर्जाहीनता दिसताच माजी सरपंच गिरीश भामरे, शेतकरी संघटना नेते सुभाष शिंदे, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी काम रोखले. बांधकाम विभागाचे अभियंता जयंत पवार व कंत्राटदार रवींद्र अहिरे यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारण्यात आला. “अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांनुसार काम झाले नाही, तर एक इंचही काम पुढे सरकू देणार नाही,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला. मंजूर निधी, तांत्रिक निकष व कंत्राटदाराच्या माहितीचा अधिकृत फलक लावण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या रोषानंतर अभियंता जयंत पवार यांनी निकृष्ट मुरूम तात्काळ हटवण्याचे आदेश ठेकेदाराला दिले. ^रस्त्याच्या कामाची पाहणी करून कंत्राटदाराला तांत्रिक निकषांनुसारच काम करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार ‘प्लॅन एस्टिमेट’ व माहिती फलक लावण्यात येत असून, कामाच्या गुणवत्तेत कसूर खपवून घेतली जाणार नाही. – जयंत पवार, अभियंता, बांधकाम विभाग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *