निकालात गोंधळ; बाटूकडून विद्यार्थ्यांना कॅम्पस प्रवेश बंदी:डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे ॲप क्रॅश झाल्याने 4 सेमिस्टरचे निकाल मिळेना



महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाचा डोलारा सांभाळणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा (बाटू) डिजिटल भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठाअंतर्गत एआयपी ॲप्लिकेशन अचानक क्रॅश झाल्याने तब्बल दोन शैक्षणिक वर्षांतील (२०२२ ते २०२४) चार सेमिस्टर

.

या निष्काळजीपणामुळे हजारो इंजिनिअरिंग पदवीधरांची मूळ गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रे रखडली असून हाताशी आलेल्या नामांकित कंपन्यांच्या नोकऱ्या गमावण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढवली आहे. अपयश झाकण्यासाठी आता महाविद्यालयांना जुना डेटा मॅन्युअली भरण्याचे आदेश दिले. मात्र, अधिकृत मूळ नोंदच नष्ट झाल्याने प्राचार्यांनीही हतबलता व्यक्त केली आहे.

अधिकाऱ्यांकडूनही माहिती देण्यास केली जातेय टाळाटाळ

या गंभीर प्रकाराबाबत बाटूचे कुलसचिव डॉ. ब्रिजेश अय्यर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर जळगाव उपकेंद्राचे प्रमुख रमेश रावलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. , बाटू विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेले (०२१४) ०२७५१४२, ०२७५२१२ हे दोन्ही हेल्पलाइन क्रमांक बंद आहेत. २०२५-२६ च्या अहवालानुसार, महाराष्ट्रात बाटूशी एकूण ४५५ महाविद्यालये व संस्था संलग्न आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, जळगावसह नऊ विभागीय व उपकेंद्रांतील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होते आहे.

तात्पुरती का होईना गुणपत्रके द्या

२०२१-२०२५ बॅच पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी अंतिम मार्कशीट मिळालेली नाही. हक्काच्या कागदपत्रांअभावी कॅम्पस प्लेसमेंट व नोकऱ्या हातातून गेल्या आहेत. विद्यापीठाने आता तरी खरी परिस्थिती जाहीर करून तात्पुरती का होईना अधिकृत गुणपत्रके द्यावीत. ज्ञानेश्वरी वाघुळदे, विद्यार्थिनी

प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. गीतांजली महामुणकर यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व प्रकारच्या ऑफलाइन अर्जांवर आणि प्रत्यक्ष भेटींवर बंदी घालण्यात आली आहे. २९ जुलै २०२६ पासून ऑनलाइन तक्रार निवारण सुरू केल्याचा दावा करत एक क्यूआर कोड दिला गेला असून विद्यार्थ्यांनी मुख्य कॅम्पस किंवा विभागीय केंद्रांवर न येता घरबसल्या टोकन काढावे असा फतवा वजा परिपत्रक ११ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या विद्यापीठाला स्वतःचा सर्व्हर सांभाळता आले नाही ते क्यूआर कोडवर आमचे गहाळ निकाल कसे शोधणार? असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत आहे, शिक्षण विभागाने या प्रकाराची सखोल चौकशी करुन न्याय मिळवून देण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *