बाळासाठी घरी दूध नव्हतं, पती अचानक बेपत्ता झाले,:कोरोनाने रोजीरोटी उद्धवस्त केली; वाचा संकटाच्या फौजेशी लढणाऱ्या शोभा कांबळे यांची संघर्षगाथा!



संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण संकटांसमोर झुकायचं की त्यांच्याशी दोन हात करायचं, हेच माणसाचं खरं सामर्थ्य ठरवतं…आणि जेव्हा प्रश्न असतो आपल्या संसाराचा, आपल्या लेकरांच्या भविष्याचा, तेव्हा एक स्त्री कोणत्याही संकटाला भिडू शकते. वेळ पडली तर रणरागिणी होते, तर कधी संयमाची ढाल बनून परिस्थितीशी लढते. अशाच जिद्दीची, धैर्याची आणि संघर्षाची कहाणी आहे छत्रपती संभाजीनगरच्या शोभा कांबळे यांची! संकटांनी कितीही घेरलं, परिस्थितीने कितीही परीक्षा घेतली, तरी न डगमगता प्रत्येक संकटाला भिडणाऱ्या या रणरागिणीचा प्रवास नेमका कसा आहे? ते जाणून घेऊया… वाशीम जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावात, डोंगराच्या पायथ्याशी शोभा ताईंचं बालपण गेलं. आई-वडिलांच्या छत्रछायेत वाढलेल्या शोभा ताईंच्या बालपणाला मात्र गरिबीची किनार. घरात दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत. सकाळचे सहा वाजले की त्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्यांच्या बालपणातही परिस्थितीने हातात खेळणी नाही, तर काम दिले. त्या जंगलात जायच्या, धावड्याच्या झाडाचा डिंक काढायच्या आणि तो विकून घरखर्चाला हातभार लावायच्या. त्या डिंकाची किंमत त्यावेळी तीन रुपये पाव किलो होती. वडील शेतकरी. गावातल्या वाण्याकडे ते सालाने काम करायचे. सहा महिने काम केल्यानंतर त्यांना मोबदला म्हणून सहा पायल्या ज्वारी आणि अवघे वीस रुपये मिळायचे. त्यामुळे शोभा ताईंच्या आयुष्याची पहिली ओळच संघर्षाने लिहिली गेली. वयाच्या अवघ्या ‘पंधराव्या’ वर्षी आई-वडिलांनी लग्न लावून दिल. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या शोभा ताई अकोल्याला राहायला आल्या. पती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील हिवताप नियंत्रण पथकात काम करायचे. सुरुवातीचे दिवस अत्यंत छान गेले. घरची परिस्थिती बेताची असली, तरी संसारात समाधान होतं. काही काळात दोन मुलं झाली आणि शोभा ताईंचं आयुष्य मुलांभोवती फिरू लागलं. मात्र या सुखाच्या दिवसांना फार काळ मुक्काम नव्हता. लग्न झाल्यानंतर काही काळातच त्यांच्या पतीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचं त्यांना जाणवू लागलं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही बाब लग्नाआधी त्यांच्यापासून आणि त्यांच्या कुटुंबापासून लपवून ठेवण्यात आली होती. मानसिक आजार असल्यामुळे पतीची नोकरी जास्त काळ राहिली नाही. घरात येणारा एकमेव उत्पन्नाचा आधार अचानक बंद झाला. त्यामुळं पुन्हा गरिबीनं ग्रासलं. काही काळ निघून गेल्यानंतर शोभा ताईला पुन्हा दुसरे मूल झाले. तेव्हाघरात अन्नाचा दाणा नव्हता. मुलाला काय द्यायचं, हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा होता. यावर बोलताना शोभा ताई म्हणतात, ‘मला दुसरं मूल झालं तेव्हा सगळा प्रकार समोर आला. पतीची नोकरी गेल्यामुळं एक वेळच अन्न मिळणंसुद्धा मुश्किल झालं. माझा मुलगा तेव्हा फक्त १२ दिवसांचा होता. मूग आणून ते बारीक करून मग खायला द्यायचे. बाळाला त्रास होऊ नये म्हणू आमच्या घरमालकाची बायको नवऱ्यापासून लपून मला चांगलं खायला आणून द्यायची. माझ्या घरच्यांना ही परिस्थिती कळल्यावर त्यांनी मला घरी बोलावलं. मी सहा महिने माझ्या माहेरी होते. पण नंतर पुन्हा सासरी आले. तेव्हा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आमच्याकडे पैसेही नव्हते. नंतर मी जे मिळेल ते काम करून घर चालवायला लागले. जेव्हा मला चौथं मूल झालं तेव्हा माझ्या कवळ्या लेकराला उचलून माझ्या नवऱ्याने फेकून दिलं. तेव्हा मग सगळ्यांना जाणवलं की खरोखरच त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. तेव्हा मग उपचार करायला सुरुवात केली.’ शोभा ताई सांगतात की त्यांच्या पतीला तब्बल नऊ शॉक दिले. मात्र परिस्थितीला शरण न जाता त्या लढत राहिल्या. त्यावेळी त्यांनी नवऱ्याचा प्रचंड मार खाल्ला. एवढं असून सुद्धा शोभा ताईंनी कधी त्यांचा पत्नी असण्याचा धर्म सोडला नाही. कारण मुलं हळुहळू मोठी होत गेली आणि भार वाढत गेला. त्या म्हणतात, ‘मी अखेर बँकेकडून कर्ज काढलं आणि एक किराणा दुकान टाकलं. त्यावेळी माझा मुलगा दहावीच्या वर्गात शिकत होता. त्यानेही मला प्रचंड साथ दिली. त्यावर मी मोठ्या मुलीचं लग्न केलं. त्यानंतर माझा लहाना मुलगाही त्याच्या वडिलांसारखाच वागू लागला. नंतर तो स्वतःहूनच म्हणाला की मला इथे राहायचं नाही. तेव्हा माझ्या दोन्ही मुलांना मी औरंगाबादला पाठवलं.’ शोभा ताईंच्या काळजात काय झालं असेल, याची कल्पना करणंही कठीण आहे. पण त्यांनी पुन्हा मुलाच्या भविष्यासाठी निर्णय घेतला. शोभा ताईंच्या पाचवीलाच जणू अठरा विश्वं दारिद्र्य पुजलं होतं. माहेरीही गरिबी होती आणि सासरी त्यांच्या संयमाची आणि जिद्दीची परीक्षाच सुरू होती. पण त्यांनी हार मानली नाही. आपल्या लेकरांकडं पाहून त्यांनी एक गोष्ट मनाशी पक्की केली परिस्थिती कितीही बिकट असली, तरी आपल्या कर्तव्यात कुठेही कमी पडायचं नाही. याच निर्धाराच्या बळावर त्या प्रत्येक संकटाला सामोरं जात राहिल्या आणि परिस्थितीशी दोन हात करत पुढे चालत राहिल्या. लहान्या मुलीच्या कल्पनेने आयुष्य बदलले ! नवरा आजरानं त्रस्त असल्यामुळं संपूर्ण कुटुंबाचा भार शोभा ताईंनी आपल्या खांद्यावर घेतला. त्यात मुलांना शिकवायची त्यांची जिद्द त्या उराशी बाळगून होत्या. आपल्याला शिकता आलं नाही. मात्र आपल्या मुलांना आपण चांगलं शिकवून मोठं करू हा निश्चय त्यांनी केला. दोन मुलं आधीच शहरात गेलेली. मात्र मुलींसाठी शिक्षणाची सोय चांगली नसल्यामुळं आपली लहानी मुलगी ‘कांचन’ला ‘बॅचलर’ शिक्षणासाठी औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) रवाना केलं. आता घरापासून दूर राहायचं म्हणजे खाण्यापिण्याचा प्रश्न हा आलाच. राहायची सोय झाली. जेवायला मेस लावली. मात्र, घरचं खाण्याची सवय असल्यामुळं कांचनला बाहेरच खाण मानवलं नाही. आपल्यासारखी कितीतरी मुलं-मुली शिक्षणासाठी घर सोडून बाहेर पडले असतील आणि त्यांना अनहेल्दी जेवण जेवावं लागत असेल. कांचन या विचारात गढून गेली. शेवटी तिनं आईला फोन केला आणि सगळी परिस्थिती सांगितली. आई-वडिलांनी अकोल्याहून औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) येऊन राहावं आणि घरगुती मेस सुरू करावी असा हट्ट धरला. शेवटी २००७ ला शोभा ताई त्यांचा बाडबिस्तारा घेऊन औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) स्थायिक झाल्या. मात्र कुठलाही व्यवसाय चालू करायचा म्हंटल्यावर भांडवल हे लागतंच. ते नसल्यामुळं एक मोठा प्रसंग समोर येऊन ठेपला. नातेवाईकांकडून कर्ज घेऊन त्यांनी आपली छोटीशी खानावळ सुरू केली. आपलं शिक्षण आणि आपला व्यवसाय सांभाळत कांचन तिच्या भावंडासोबत मोठी होत होती. या साऱ्या प्रसंगात ती आपल्या आईच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. पतीला आजाराने घेरलेलं होतंच. त्यामुळे त्यांची साथ शोभा ताईंना मिळेना. पण धीराची नसेल ती शोभा ताई कसली. आपल्याला कोणाचा आधार नसला, तरी आपण स्वतःचा आधार बनून राहायचं ही खूणगाठ त्यांनी पदराशी बांधून ठेवली आणि आपल्या मुलांच्या साथीनं एक नवीन विश्व निर्माण करण्यास सुरुवात त्यांनी केली. विद्यापीठात मेस चालू केल्यामुळे अनेकांनी विरोध केला! शोभा ताईंच्या मुलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि‌द्यापीठात जनसंवाद व वृत्तपत्र विद्याविभागात’ प्रवेश घेतला. त्याचं शिक्षण चालू होतं. आपल्या डोक्यावर असलेले कर्ज फेडले जावे आणि घराला हातभार लागावा म्हणून त्याने विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात मेस चालवण्यासाठी परवानगी मिळवली. यात त्यांना संचालकांचा तसेच शिक्षकांचा बराच हातभार लागला. २००९ मध्ये आता सगळ चांगल होणार या भावनेनं शोभा ताई विद्यापीठात आल्या. मात्र, मेस चालू केल्यानंतर अनेक जणांनी त्यांना घेरलं. परंतु त्यांच्या मुलीने धीर दिला. ते म्हणतात ना ज्या माणसामध्ये सहन करण्याची शक्ती जास्त असते त्याच माणसाला अधिक सहन करावं लागतं. असंच काहीसं शोभा ताईंचं. आपण चांगल्या दर्जाचे जेवण देतो हा विश्वास मुलींमध्ये निर्माण करताना अनेक कष्ट त्यांना करावे लागले. हळुहळू दिवस सरत गेले आणि शोभा ताईंचे दिवस आले. मुलींना जेवण आवडू लागलं. चांगल्या दर्जाचे जेवण असल्यामुळे दर महिना ‘६००’ रुपयाने तब्बल ‘३०० ते ३५०’ मुलींनी त्यांच्याकडे डब्बा लावला. रोज मुलींचा असलेला तो कल्लोळ, त्यांचा धिंगाणा, भांडण ह्या साऱ्या गोष्टींमध्ये शोभा ताई अशा रुळल्या जणू काही त्यांचं आणि त्या मुलींचं जन्मोजन्माच नातं होतं. या साऱ्यामध्ये त्यांच्या मुलांची खूप साथ शोभा ताईला लाभली. त्या म्हणतात “मला माझ्या नवऱ्याची साथ मिळू शकली नाही ह्याच दुःख आहे. मात्र त्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम मला माझ्या मुलांच्या साथीनं करता आलं”.
आपल्या घराची आर्थिक धुरा हा घरातला पुरुषच सांभाळू शकतो, हे शोभा ताईंनी खोटं ठरवलं. त्या म्हणतात, “अतिशय कठीण परिस्थितीत माझ्या कांचननं साथ दिली. आपलं शिक्षण आणि घर ह्या दोन्हीची कास धरत मला सांभाळत, स्वतः च्या पायावर उभ राहण्याची जिद्द तिनं पूर्ण करून दाखवली. तिनं जो काही पै-पैसा जमा केला, त्यातून एक छान घरकुल आमच्यासाठी तयार केल. जोपर्यंत घर बांधत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशी शपथच जणू तिने घेतली. तिने ती पूर्णही केली. एका आईनं आयुष्यभर मुलांसाठी घर उभं केलं होतं आणि एका मुलीनं त्याच आईसाठी घर उभं करून तिच्या संघर्षाला एक छप्पर दिलं. एक स्त्रीही पुरुषांप्रमाणेच घर सांभाळू शकते, हे शोभा ताईच्या कहाणीवरून लक्षात येते. माझे मालक गेले ते कधीच वापस न येण्यासाठी ! शोभा ताईंच्या आयुष्यात सुख फार काळ टिकत नव्हतं. मुलीचं लग्न झालं. मोठ्या मुलाचं शिक्षणही झालं. लहान्या मुलाने हॉटेल मॅनेजमेन्टचा कोर्स पूर्ण केला. आज तोही आईला हात भार लावतो. अशातच शोभा ताईंचे पती घरातून निघून गेले, ते पुन्हा कधी वापस आलेच नाहीत. शोभा ताई सांगतात, ‘माझे मालक २०१२ मध्ये घरातून अचानक निघून गेले. माझ्या कांचननं नेमक्याच घेतलेल्या घरात आम्ही राहायला गेलो होतो. तेव्हा खुलताबादचा उरूस चालू होता. ते त्याच दिशेने गेले होते. आम्ही त्यांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. सगळीकडे बातम्या दिल्या, पोलिसात तक्रार पण केली. मात्र देवाला माझं सुख बघवत नव्हतं. ते वापस आलेच नाहीत.’ शोभा ताईच्या घरात आंनदी आनंद नांदत होता. मात्र त्यांचा आनंद परिस्थिती सतत हिरावून घेत होती. माय-लेकीची ताटातूट शोभा ताईंचं आयुष्य अजून एका मोठ्या धक्क्याची वाट पाहत होतं. मुलगी पोटूशी राहिली आणि शोभा ताईचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलीचे किती लाड करू आणि किती नको असं त्यांना झालं. काही दिवस ओसरल्यानंतर कांचन ही आपल्या पतीसोबत एका डोंगरावर राहत होती. तिथे एका छोट्याशा शाळेची मुख्याध्यापिका होती. डोंगरावर राहत असल्यामुळे गरोदरपणात एवढा चढ चढणं शक्य व्हायचं नाही, पण एक दिवस तो चढ चढावा लागला आणि दुर्दैवाने कांचनच बाळ त्यातच मरण पावलं. पुन्हा मूल नको कांचनच्या पतीची भावना होती. ह्यातच शोभा ताई आणि त्यांच्या जिवाच्या तुकड्यात दरी निर्माण झाली. पतीची साथ मिळाली नाही. ह्यामुळे त्या दुःखी होत्याच. त्यात भर म्हणून त्यांची कांचन ही त्यांच्यापासून दूर झाली. परंतु तरीही त्या हरल्या नाहीत. त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं. आता त्या सगळा आनंद आणि वेळ हॉस्टेल मधल्या मुलींसोबत घालू लागल्या. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात होता… सगळ्या गोष्टी मागे सोडून देत नव्याने सुरुवात त्यांनी केली. पण शोभा ताईच्या आयुष्यात जणू काही आनंद लिहिलेलाच नव्हता. आनंदात विरजण पडावं तसं कोरोनाचा काळ सुरू झाला. ज्यामध्ये शोभा ताई सुख शोधायच्या ते सुख नियतीने हिरावून घेतलं. सततचा मुलींने भरलेला तो जेवणाचा हॉल अचानक शांत झाला. जो काही पोट भरण्यासाठीचा सोर्स होता तोही ठप्प झाला. आता मात्र शोभा ताई खचत चालल्या होत्या. मुलींचे आवाज त्यांना रात्री त्रास देत होते. कोणी रडतंय, कोणी हसतंय. असे आवाज सतत त्यांच्या कानी घुमायचे. कधी एकदा हा कठीण काळ जातोय आणि मी पुन्हा हा हॉल गच्च मुलींनी भरलेला पाहतीये अशी अवस्था त्यांची झाली होती. लॉकडाऊनमुळे पैसा येण्याचा सोर्स बंद झाला. एक दिवस अशी वेळ आली की शोभा ताईकडे साधी कागदपत्र तयार करण्यासाठी पैसे नव्हते. आयुष्यभर शेकडो लोकांच्या पोटाची भूक भागवणाऱ्या त्या स्त्रीच्या हातात स्वतःच्या गरजेपुरते पैसेही उरले नव्हते. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी बँकेकडे धाव घेतली. या साऱ्या गोष्टी सांगताना शोभा ताईंच्या अश्रूंचा बांध फुटला.

काही काळानंतर हॉस्टेल पुन्हा उघडले आणि शोभा ताईंना नशिबाच दार उघडल्याची भावना निर्माण झाली. नियती त्यांना सतत खाली पाडत होती आणि त्या नव्यानं उभ्या राहत होत्या. शोभा ताईंच्या हाताखाली काम करण्यासाठी एकूण ‘चार बायका’ होत्या. तसेच घरातल्या ‘सुना आणि मूल’ हे देखील त्यांना कामात मदत करायचे. बाहेरच्या मोठं मोठ्या जेवण्याच्या ऑर्डर त्या घेत होत्या. त्यांची ही धडपड फॅमिली बिजनेस म्हणून गणला. मात्र २०२४ मध्ये त्यांच्या लहान मुलाला या व्यवसायात लॉस झाल्यामुळे विद्यापीठातून त्यांना निघावे लागले. पुढचं एक वर्ष त्यांनी बाहेरूनच मेस चालवली. जिथे त्या रोज २५० -३०० मुलींचे जेवण बनवत होत्या, तिथे तो आकडा ४० वर येऊन ठेपला. नंतर SRPF च्या कॅम्पमध्ये मेस चालवण्याची संधी भेटली. एक-दोन वर्ष ती चालवली. तेही त्यांच्या हातातून निघून गेलं. सध्या त्या ३० ते ४० जणांसाठी जेवण बनवतात. मेसच्या जोरावर ताईंनी घर घेतलं, सर्व मुलांचे लग्न लावून दिलं. आज त्यांचा सुखी संसार बघून त्या जीवन जगत आहेत. त्यांनी मुलगी, पत्नी, आई आणि आता आजीची भूमिका चोखपणे पार केली. शोभा ताईंनी वयाची साठी ओलांडली असली, तरी सुद्धा आजही त्या जसं काम मिळेल तसं करतात. शोभा ताई सांगतात, ‘माझ्या आयुष्यात लहानपणापासूनच संघर्ष लिहिला आहे. काही मोजकेच दिवस चांगले असतात आणि बाकी सगळे दिवस परीक्षेचे असतात. त्यामुळं मी माझ्या मनाला सतत सांगत असते की कितीही संकट आली तरी स्वतःला खचू द्यायचं नाही. वाईट दिवस जास्त काळ राहत नाहीत. स्वतःला सांगत राहायचं की सगळं काही चांगलं होईल.’ आयुष्यानं त्यांच्या वाट्याला सुखापेक्षा संघर्षच जास्त दिला. कधी गरिबीनं त्यांची परीक्षा घेतली, कधी पतीच्या आजारानं, कधी लेकरांच्या भवितव्याची चिंता त्यांच्या डोक्यावर होती, तर कधी नियतीने त्यांच्या हातात आलेला आनंदच हिरावून घेतला. एक-दोनदा नाही, तर वारंवार त्या कोसळल्या. मात्र प्रत्येक वेळी त्या पुन्हा नव्याने उभ्या राहिल्या. आयुष्यात अनेक पायऱ्या असतात काही यशाच्या असतात तर काही अपयशाच्या. त्यामुळे कोणत्याच पायरीवर न थांबता सतत चालत राहिलं पाहिजे. आपल्याला रस्ता आपोआपच मिळत जाईल. शोभा ताई म्हणतात ‘परिस्थिती जर तुम्हाला खेळवत असेल तर तिला खेळवण्याची ताकद तुमच्यात असायला हवी.’ जगात अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्या की खूप कठीण परिस्थितीत स्वतःला सिद्ध करतात. त्यातलीच एक स्त्री म्हणजे शोभा ताई…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *