उस्ताद रजब अली खाँ यांचे सांगीतिक योगदान उलगडले:‘किराना परंपरा’ मालिकेत डॉ. सरवडीकर, कुंटे यांनी मांडणी केली




कव्वालबच्चे परंपरेसह किराणा आणि जयपूर या घराण्यांची गायकी स्वीकारून स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण गायनशैली घडवणारे बुजुर्ग उस्ताद रजब अली खाँ यांच्या सांगीतिक योगदानावर ‘किराना परंपरा’ या मालिकेत प्रकाश टाकण्यात आला. त्यांनी कंठसंगीताप्रमाणेच वाद्यसंगीतातही स्वतःची शिष्यपरंपरा निर्माण केली होती. डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित ‘किराना परंपरा’ मालिकेतील पाचव्या सत्रात उस्ताद रजब अली खाँ यांच्या गायनशैलीविषयीचे विवेचन संगीताचे अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य, गायक डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी केले. जे. एम. रोड येथील स्वरमयी गुरुकुल सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ. चैतन्य कुंटे यांनी सांगितले की, उस्ताद रजब अली यांनी त्यांच्या काळात प्रचलित आणि लोकप्रिय असलेल्या गायकींचे मर्म समजून, त्यातील आवडलेले अंश आत्मसात केले. घराण्यांची शिस्त कडक असताना आणि गुप्तता राखली जात असतानाही, त्यांनी जयपूर आणि किराणा घराण्यांची गायनशैली जाणून घेत, त्यातील काही अंश आपल्या गायनात मिसळण्याचे धैर्य दाखवले आणि स्वतःची संमिश्र गायकी मान्यताप्राप्त करून दाखवली. डॉ. अतींद्र सरवडीकर म्हणाले की, रजब अली यांनी सुराकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आत्मसात केली होती. उस्ताद अल्लादियाखांसाहेब आणि रजब अली यांच्यात स्पर्धात्मक चुरस असली तरी, मनातून दोघांनाही परस्परांविषयी आदर होता आणि ते एकमेकांचे श्रेष्ठत्व मानत होते. रजब अली यांच्या संगीतसाधनेला आध्यात्मिक बैठकही होती. कंठसंगीताप्रमाणेच ते तबला, जलतरंग आणि बीनवादक होते. लता मंगेशकर यांनाही रजब अली यांच्या गायकीविषयी आत्मीयता होती. त्यांच्या काही बंदिशी नंतर चित्रपटगीतांमध्येही आलेल्या आढळतात, असे डॉ. सरवडीकर यांनी नमूद केले. यावेळी विदुषी कल्पना झोकरकर यांनीही काही आठवणींना उजाळा दिला. वडील कृष्णराव मुजुमदार यांच्याकडून उस्ताद रजब अली यांच्याविषयी अनेक आठवणी आणि किस्से समजले. तसेच, उस्ताद आमीर खाँ आमच्या घरी नेहमी येत असत आणि त्यांच्याकडूनही रजब अलींच्या अनेक वैशिष्ट्यांची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला फाऊंडेशनचे कार्यक्रम दिग्दर्शक प्रसाद भडसावळे, डॉ. भारती एम. डी., ज्येष्ठ तबलावादक पंडित पांडुरंग मुखडे आणि प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *