केवळ भरधाव वेग म्हणजे निष्काळजीपणा नव्हे:मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वाहनचालकाची निर्दोष मुक्तता




केवळ वाहन भरधाव वेगाने चालविले, एवढ्याच कारणावरून वाहनचालकाने निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालविल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले आहे. या निरीक्षणासह न्यायालयाने सुनील मोहन सानप या वाहनचालकाची भादंवि कलम २७९ आणि ३०४-अ अंतर्गत सुनावलेल्या शिक्षेतून निर्दोष मुक्तता केली आहे. काय आहे प्रकरण? ५ फेब्रुवारी २०१२ रोजी झालेल्या एका मोटार अपघातात एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आष्टी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनील सानप यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला सानप यांनी बीड येथील सत्र न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र सत्र न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. या दोन्ही न्यायालयांच्या निर्णयांविरुद्ध सानप यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. केवळ वेगावरून बेदरकारपणा ठरवता येणार नाही अर्जदाराच्या वतीने अॅड. संदीप बी. राजेभोसले यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना निदर्शनास आणून दिले की, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने केवळ वाहन वेगात असल्याचे सांगितले आहे. तसेच, घटनास्थळाजवळ गतिरोधक असल्याचेही साक्षीतून समोर आले. त्यामुळे केवळ वेगाच्या आधारावर वाहन बेदरकारपणे चालवल्याचा निष्कर्ष काढणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. सरकार पक्षाचा पुरावा अपुरा न्यायमूर्ती सुशील एम. घोडेस्वार यांनी पुराव्यांचे परीक्षण केल्यानंतर स्पष्ट केले की, अर्जदाराने वाहन बेदरकार व निष्काळजीपणे चालविल्याचे सिद्ध करणारा पुरेसा आणि ठोस पुरावा सरकार पक्षाने सादर केलेला नाही. वाहन अतिवेगात असले तरी ठोस पुराव्याअभावी बेदरकारपणाचा निष्कर्ष काढता येणार नाही. या आधारावर न्यायालयाने आष्टी आणि बीड न्यायालयाचे निर्णय रद्द करत सानप यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अॅड. संदीप राजेभोसले यांना अॅड. उद्धव दौंड, अॅड. यशश्री देशमुख, प्रशांत गायकवाड, अर्जुन इंगळे आणि प्रियेश राणे यांनी कायदेशीर सहकार्य केले. ————- हेही वाचा.. CJPचा दिल्ली पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम: म्हणाले- परवानगी न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करणार; पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा अर्धवट व्हिडिओ दाखवला- दिपके कॉकरोच जनता पार्टीने दिल्ली पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची तारीख मिळाली नाही, तर पुन्हा आंदोलन करू, असे त्यांनी म्हटले आहे. CJPचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरव दास सोमवारी आंदोलनाची परवानगी मागण्यासाठी पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात पोहोचले होते. दरम्यान, CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ एडिट करून जारी केला आहे. ते म्हणाले—धाडस असेल तर संपूर्ण व्हिडिओ दाखवा. दीपके यांच्या म्हणण्यानुसार, आजीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या चुलत भावाशी बोलू देण्याची विनंती केली. दोन मिनिटांसाठी फोन देण्यासही सांगितले, मात्र पोलिसांनी परवानगी दिली नाही. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *