![]()
देवाभाऊ म्हणजे कामधेनू आहेत, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत आहेत, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. तसेच त्यांना आपल्या मनातील इच्छा माहित असल्याने जास्त बोलू नको असा निरोपही त्यांनी दिल्याची पुष्टी मुंडे यांनी जोडली. धनंजय मुंडे यांनी असे म्हटल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या डोक्यात टपली मारली. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे महापशुधन एक्सपोच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी परळीमध्ये आले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री यांच्यासह पंकजा मुंडे व धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळ भाषण करताना धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख कामधेनू असा केला. धनंजय मुंडे त्यांच्या भाषणाच्या शेवटी बोलताना म्हणाले, मी त्यांना आधीच कामधेनू म्हटले आहे, म्हणजे आमच्या मनातल्या इच्छा तुम्हाला माहित आहेत. म्हणून जास्त बोलू नको असा त्यांचा निरोप आला. त्यांनी आतापर्यंत आपल्याला जे दिले त्याबद्दल त्यांचे आभार. आमच्या मनातल्या इच्छा तुम्हाला माहित आहेत. त्यानंतर भाषण संपल्यावर बसत असताना देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या डोक्यात टपली मारल्याचे पहायल मिळाले. दरम्यान, आजच्या या कृतीनंतर तसेच धनंजय मुंडे यांनी केलेल्या विधानांचे आता तर्क-वितर्क लावले जात आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. त्यावेळी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. आणि आता धनंजय मुंडे यांचे विधान हे त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे. 83.8 सेंटीमीटरच्या राधा म्हशीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळीमधील या एक्सपोला भेट दिली. यावेळी त्यांनी 83.8 सेंटीमीटर या सर्वात लहान उंचीच्या राधा म्हशीची पाहणी केली. राधा म्हशीची गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
देवाभाऊ म्हणजे कामधेनू:धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने, म्हणाले- त्यांना आमच्या मनातल्या इच्छा माहीत असतात
