शेतीचे अर्थकारण धोक्यात:पिके करपली, विहिरी आटल्या; श्रीगोंद्यात दुष्काळाचे दुहेरी संकट, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठीही संघर्ष‎

महाराष्ट्र




श्रीगोंदे तालुक्यात पावसाअभावी दुष्काळाची तीव्रता वाढत असून, त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांच्या पाणीपातळीत घट झाल्याने शेतीसाठी पाणी उपलब्ध करणे कठीण झाले आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागत असून, त्यासाठी अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी केलेली गुंतवणूक वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होऊन आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. दुष्काळाचे सावट आता पिण्याच्या पाण्यावरही पडू लागले आहे. जलस्रोतांतील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र होण्याची चिंता व्यक्त होत आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत असून, पशुपालकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठा आणि चारा उपलब्धतेचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी आणि पीकविम्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *