दाढी येथे गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा:प्रगटदिनी आमदार राणांकडून सभामंडपासाठी 30 लाखांची घोषणा




अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील दाढी येथे श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महाराजांच्या प्रगटदिनी आयोजित या कार्यक्रमाचा प्रारंभ होम-हवन आणि कलश स्थापनेने झाला. यावेळी आमदार रवि राणा प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वैदिक मंत्रोच्चारात श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर होम-हवन आणि कलश स्थापनेचे विधी पार पडले. यावेळी संपूर्ण परिसर “गण गण गणात बोते” च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावून प्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभामंडपाची गरज असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. या मागणीवर आमदार रवि राणा यांनी तात्काळ प्रतिसाद देत सभामंडपासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. आमदार राणा यांनी यावेळी सांगितले की, संतांचे विचार समाजाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन देतात. त्यांचा आदर्श घेत आपण त्यांचेच त्यांना परत करत आहोत. त्यांच्या या वक्तव्याचे उपस्थितांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला वसंतराव सोनपरोते, ठाकूरदासी लढ्ढा, माजी सरपंच गोपालभाऊ येवले, पोलीस पाटील राजूभाऊ तेलमोरे, सरपंच सुमित नकाशे यांच्यासह दाढी आणि पेढी येथील अनेक ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *