![]()
ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने शहरातील सर्व ढोल-ताशा पथकांच्या प्रतिनिधिक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध गणपती मंडळांचे पदाधिकारी आणि शहरातील ढोल-ताशा पथकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे नितीन पंडित, भाऊसाहेब रंगारी मंडळ ट्रस्टचे पुनीत बालन, सरस्वती कराड हॉस्पिटलचे शिरीष भातलवंडे, जिलब्या गणपती सार्वजनिक मंडळ ट्रस्टचे भूषण पंड्या उपस्थित होते. ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर, ॲड. शिरीष थिटे, अक्षय बलकवडे, विलास शिगवण, अभिजीत कुमावत, प्रशांत तांबे, ओंकार कलढोणकर आणि अमर भालेराव हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून भाविक आणि पर्यटक येतात. यंदाचा गणेशोत्सव अधिक सुयोग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी पुणे महानगरपालिकेसह विविध संघटनांकडून करण्यात येणारी कामे एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला जाईल. ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला उशीर झाल्यास त्याचे खापर अनेकदा ढोल-ताशा पथकांवर फोडले जाते. मात्र, प्रत्यक्षात गणेशोत्सवाला शिस्तबद्ध स्वरूप देण्याचे मोठे काम या पथकांनी केले आहे. वादक आपल्या वादनातून श्रीगणेशाची सेवा आणि पूजा करतात, तसेच उत्सवामध्ये रंगत आणण्याचे कामही ही वाद्यपथके करतात. ते पुढे म्हणाले की, सुमारे १५० दिवस सराव करून, आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून वादक गणेशसेवा करतात. असे असतानाही वादक आणि पथकांकडे कायम नकारात्मक दृष्टीने का पाहिले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वादकांच्या मागे कोणीतरी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
ढोल ताशा महासंघाकडून वाद्यपूजन:कसबा गणपती मंदिरात शहरातील पथकांचे प्रतिनिधिक पूजन
