![]()
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेच्या एका लोकलमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात बुरखा घालून शिरलेल्या एका संशयित व्यक्तीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. महिला प्रवाशांनी संशय आल्यावर त्याला पकडले आणि त्याचा व्हिडिओही बनवला, परंतु घाटकोपर स्थानक येताच त्याने फिल्मी स्टाईलने धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन केले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना CSMT च्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये घडली. घाटकोपर स्थानकात पोहोचण्यापूर्वी महिला डब्यात एक व्यक्ती बुरखा घालून बसल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. बुरखा घातलेली ही व्यक्ती डब्यातील इतर महिलांना जाणूनबुजून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. सदरील व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने महिलांनी त्याला घेराव घातला आणि चौकशी सुरू केली. काही महिलांनी या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. स्वतःचे पितळ उघडे पडल्याचे लक्षात येताच, ट्रेन घाटकोपर फलाटावर पोहोचण्यापूर्वीच त्याने विरुद्ध दिशेला उडी मारली आणि समोर उभी असलेल्या कर्जत फास्ट लोकलमध्ये चढून पळ काढला. रेल्वे पोलिसांचा ‘संयुक्त’ तपास सुरू या घटनेनंतर रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) सतर्क झाले आहेत. पोलिसांनी तातडीने मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर शोधमोहीम राबवली, मात्र आरोपी हाती लागला नाही. याप्रकरणी घाटकोपर RPF ने रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. कुर्ला जीआरपीचे वरिष्ठ अधिकारी संभाजी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात आंबिवली स्थानकावर बुरखा घालून आलेल्या एका व्यक्तीने चेन स्नॅचिंग केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाची एफआयआर कल्याण जीआरपीमध्ये नोंद आहे. पोलीस आता या दोन्ही घटनांमधील व्यक्ती एकच आहे का, याचा तपास करत आहेत.
मुंबई लोकलमध्ये थरार!:महिलांच्या डब्यात बुरखाधारी संशयित शिरला, संशयास्पद चाळे; बिंग फुटताच धावत्या ट्रेनमधून उडी मारून पसार
