जेलमध्येही अशोक खरातची कोट्यवधींची कमाई:कुंभमेळा रिंगरोडमुळे 3 कोटींचा मोबदला; जमीन संपादनातून मिळणार रक्कम
![]()
नाशिकमध्ये दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची चौकशी सुरू असताना अंमलबजावणी संचालनालयाचाही त्याच्यावर लक्ष असल्याची माहिती आहे. मात्र, एका बाजूला कायदेशीर अडचणींमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या आयुष्यात दुसऱ्या बाजूला मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे समोर आले आहे. कुंभमेळा रिंगरोड प्रकल्पासाठी त्याच्या कुटुंबीयांची जमीन संपादित केली जात असून त्याबदल्यात तीन कोटी रुपयांहून अधिक मोबदला मिळणार असल्याने नाशिकमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकमध्ये ‘कुंभमेळा रिंग रोड’ हा महत्त्वाचा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी विविध भागांतील जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यात अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनींचाही समावेश आहे. या भूसंपादनामुळे खरात कुटुंबाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. गुन्हेगारी प्रकरणांमुळे आधीच चर्चेत असलेल्या अशोक खरातला आता सरकारी मोबदल्याच्या रूपाने कोट्यवधींचा फायदा होणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गवळणे शिवारातील जमिनीच्या बदल्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांना सुमारे 82 लाख 83 हजार रुपयांचा मोबदला मिळणार आहे. तर पाथर्डी शिवारातील जमिनीच्या संपादनासाठी खरातच्या मुली तृप्तबाला खरात आणि सृष्टी खरात यांना जवळपास 1 कोटी 82 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे एकूण मोबदल्याची रक्कम तीन कोटी रुपयांच्या घरात पोहोचत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवहारामुळे अशोक खरातची आर्थिक गुंतवणूक आणि मालमत्तेची व्याप्ती पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. याआधी वादात अडकलेले आणि सध्या निलंबित असलेले उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नीचे नावही या जमीन व्यवहारात समोर आले आहे. संबंधित भूसंपादन प्रक्रियेत त्यांनाही लाखो रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवहारावर आता अधिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तपास यंत्रणा या व्यवहारांची चौकशी करणार का, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे. मोबदला सहज मिळतो की तपास यंत्रणा आक्षेप घेतात दरम्यान, अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत असल्याने शासकीय खरेदी प्रक्रियेदरम्यान त्याची प्रत्यक्ष उपस्थिती राहण्याची शक्यता कमी मानली जात आहे. मात्र, या व्यवहारासाठी त्याच्या दोन्ही मुली सरकारी कार्यालयात उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातला हा सरकारी मोबदला सहज मिळतो की तपास यंत्रणा त्यावर आक्षेप घेतात, याकडे आता संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.
