ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन:संवेदनशील, अष्टपैलू अन् करारी अभिनेता गमावला; नानांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त




भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, दिग्गज आणि आपल्या सखोल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील घरी असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी- गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती.
अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…- सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला अक्षरशः चटका लावणारी आहे.अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम असलेल्या नानांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने असंख्य व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटवली.नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे.कलेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील वंचित घटक आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्यही सदैव प्रेरणादायी राहील.आज अभिनयविश्वातील एक संवेदनशील मन, एक दमदार आवाज आणि एक अस्सल कलाकार हरपला आहे.या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.नानांच्या स्मृती, त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अमूल्य योगदान सदैव आपल्या मनात जिवंत राहील. अष्टपैलू कलाकार गमावला – रोहित पवार आमदार रोहित पवार म्हणाले की, सामाजिक जाण आणि भान असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारं आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रभावी आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे.‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘खामोशी’, ‘अग्निसाक्षी’, ‘नटसम्राट’, ‘वेलकम’ यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली. पडद्यावरील अभिनयासोबतच ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी केलेले त्यांचं सामाजिक कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणारं आहे.कलेच्या माध्यमातून लाखो मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या महान कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏ॐ शांती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *