सराफ व्यावसायिकांकडून मुद्देमाल जप्त करताना ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण आता बंधनकारक


पोलीस महासंचालक कार्यालयाचे परिपत्रक जारी

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील सराफ व्यावसायिकांकडून सोन्या-चांदीचे दागिने किंवा संशयित/चोरीचा मुद्देमाल जप्त करताना तपासी अधिकाऱ्यांनी संपूर्ण कारवाईचे ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण  करणे आता पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून विशेष पोलीस महानिरीक्षक (का. व सु.) लखमी गौतम यांच्या स्वाक्षरीने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना (लोहमार्गसह) यासंदर्भात अधिकृत निर्देश देण्यात आले आहेत.

सविस्तर तपशील:

  • भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १०५ चा संदर्भ: भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १०५ नुसार, पोलीस किंवा तपास अधिकाऱ्याला कोणत्याही जागेची झडती  घेताना किंवा मालमत्ता/वस्तू जप्त करताना संपूर्ण कारवाईचे ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, विशेषतः मोबाईल फोनद्वारे करणे बंधनकारक आहे.
  • विधिमंडळातील आश्वासन: सन २०२४ च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात विधिमंडळ सभागृहामध्ये लक्षवेधी सूचनेच्या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान, मा. राज्य मंत्री महोदय (गृह – शहरे) यांनी सराफ व्यावसायिकांकडे पोलीस जप्तीसाठी जातील तेव्हा व्हिडीओग्राफी कम्पलसरी केली जाईल असे आश्वासन दिले होते.
  • मार्गदर्शक तत्त्वे व पूर्व परिपत्रके: राज्यातील सराफ व्यावसायिकांकडून मुद्देमाल जप्त करताना तपासी अधिकाऱ्यांनी पाळावयाची मार्गदर्शक तत्त्वे व घ्यावयाची दक्षता याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने यापूर्वी १८ ऑगस्ट २००९, १४ ऑगस्ट २०१८ व ५ मार्च २०२० रोजी परिपत्रकांद्वारे सूचना निर्गमित केल्या होत्या.
  • कडक अंमलबजावणीचे आदेश: BNSS कलम १०५ नुसार झडती व जप्तीदरम्यान ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण करणे बंधनकारक झाले असल्याने, यापुढे सराफ व्यावसायिकांकडून मुद्देमाल जप्त करतेवेळी देखील ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे निर्देश सर्व पोलीस घटक प्रमुखांना देण्यात आले आहेत.


Post Views: 580










Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *