![]()
पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात एका व्यावसायिकाच्या घरातून सुमारे १४ लाखांची चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी १३ लाख ७९ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रीवत्स सुभाष सिन्हा (वय ३८, रा. कमलकुंज लेन, कोरेगाव पार्क) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. १ ते २ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली असून, चोरट्यांनी त्यांच्या घरातून पावणे तीन लाखांची रोकड आणि १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. सिन्हा कुटुंब कोरेगाव पार्क येथील नॉर्थमेन रोड परिसरातील बी लेनमध्ये असलेल्या कमलकुंज बंगल्यात राहते. त्यांनी जून २०२३ मध्ये घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले होते. यासाठी एका नामांकित कंपनीशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत काम सुरू करण्यात आले होते, ज्यात नऊ कामगारांची टीम होती. जुलै ते सप्टेंबर २०२३ या काळात पावसाळ्यामुळे कामाची गती मंदावली होती. त्यानंतर सिन्हा कुटुंब सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान बाहेरगावी गेले होते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत घराचे काम पूर्ण झाले. मात्र, जानेवारी २०२४ मध्ये काही ठिकाणी काम अर्धवट राहिल्याचे सिन्हा यांच्या निदर्शनास आले. यानंतर कंपनीने १७ जानेवारी रोजी दोन नवीन कामगार रंगकाम पूर्ण करण्यासाठी पाठवले. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक पेंटर घरी आला आणि सायंकाळी काम पूर्ण करून निघून गेला. त्यानंतर रात्री पत्नीने बेडरूम तपासले असता दागिने आणि पैसे व्यवस्थित होते. कुटुंब पाहुण्यांच्या खोलीत झोपले. २ फेब्रुवारी रोजी सकाळी पत्नी औषध घेण्यासाठी बेडरूममध्ये गेली असता कपाटाचा दरवाजा उघडा दिसला आणि सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आढळल्या. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस आयुक्त संगीता शिंदे, वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार डत्ते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सध्या पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
कोरेगाव पार्क येथे व्यावसायिकाच्या घरातून 14 लाखांची चोरी:पोलिसांकडून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
