पिंपरी चिंचवडच्या स्पा सेंटर्समधील देहविक्रीचा पर्दाफाश:पोलिसांच्या छाप्यात मोठे रॅकेट उघडकीस; अनेक महिलांची सुटका




पिंपरी-चिंचवड शहरातील स्पा सेंटर्स आणि लॉजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली असून एकूण आठ महिलांची सुटका केली आहे. या धडक मोहिमेत विशालनगर येथील इंटरनल फॅमिली स्पामधून चार, निगडी येथील ईगल स्पामधून दोन, तसेच कृष्णा लॉज आणि आळंदी येथील योगीराज लॉजवर छापे टाकून प्रत्येकी एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, स्पा सेंटर्समधील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाला आळा घालण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. ही धडक मोहीम पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी या पथकाचे यशस्वी नेतृत्व केले. वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘इंटरनल फॅमिली स्पा’वर रात्री 10 च्या सुमारास धाड टाकत पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली असून याप्रकरणी स्पा व्यवस्थापक अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला अटक करण्यात आली आहे. या अवैध व्यवसायाचे संचलन करणाऱ्या संबंधित महिलेसह मॅनेजरवर ‘पीटा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. निगडी येथील ईगल स्पा, कृष्णा लॉज आणि आळंदीतील योगीराज लॉजवर पोलिसांनी धडक कारवाई करत पीडित महिलांची सुटका केली आहे. अधिक पैशांचे आमिष दाखवून आणि जबरदस्ती करून महिलांना या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ओढले जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शहरातील अशा अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी कठोर पावले उचलली असून, गेल्या एका महिन्यात तीन मोठ्या आस्थापनांवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. यामध्ये चिंचवडमधील निक्की लॉज, काळेवाडीतील लेमन ग्रास थाई स्पा आणि सांगवी येथील औरा थाई स्पा यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 2025 सालात आतापर्यंत पोलिसांनी एकूण 25 स्पा सेंटर्सवर छापे टाकून ‘पीटा’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या सातत्यपूर्ण मोहिमेत आतापर्यंत 45 आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल 63 पीडित महिलांची सुरक्षितरीत्या सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *