![]()
भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी गेलेल्या दोन तरुण भावांवर काळाने घाला घातला आहे. तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध अंबागड किल्ला पाहिल्यानंतर, जवळच असलेल्या बावनथडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात आंघोळीसाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जागेश्वर वाढीवे (वय २९) आणि दीपक वाढीवे (वय २६) अशी मृत भावांची नावे आहेत. हे दोघेही लाखनी तालुक्यातील रामपुरी येथील रहिवासी होते. वाढीवे बंधू आपल्या मित्रांसह गोंड राजांच्या काळातील ऐतिहासिक अंबागड किल्ला पाहण्यासाठी तुमसर तालुक्यात आले होते. गोंडकालीन ऐतिहासिक वारसा पाहिल्यानंतर, जवळूनच वाहणाऱ्या बावनथडी कालव्याच्या पाण्याचा मोह त्यांना आवरला नाही. उन्हाचा कडाका आणि प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी दोन्ही भावांनी कालव्यात आंघोळीसाठी उडी घेतली. मात्र, कालव्यातील पाण्याचा वेग प्रचंड होता. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले आणि बघता बघता पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाले. स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी कालव्याकडे धाव घेतली. तातडीने आंधळगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले. स्थानिक मच्छिमार आणि पोहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने कालव्यात शोधमोहीम राबवण्यात आली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर दोन्ही भावांचे मृतदेह हाती लागले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. रामपुरी गावावर पसरली शोककळा रामपुरी येथील दोन तरुण मुले अशा प्रकारे दगावल्याने संपूर्ण गावावर दुःखाचे सावट आहे. कुटुंबाचा आधार असलेले दोन तरुण मुलगे गेल्याने वाढीवे कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पर्यटनस्थळी किंवा अपरिचित जलसाठ्यांमध्ये आंघोळीसाठी उतरताना पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज घेणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात.
भंडाऱ्यात पर्यटनाच्या आनंदावर विरझन:किल्ला पाहिल्यानंतर पोहण्याचा मोह बेतला जीवावर, सख्ख्या भावांचा कालव्यात बुडून मृत्यू
