महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक:खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग, विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार




महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित एका खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग करून ते प्रसारित केल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. साहित्य संवर्धन आघाडीने ही तक्रार केली असून, कुलकर्णी यांनी बदनामी केल्याचा आरोप आहे. जळगाव येथील राजेंद्र लखीचंद नन्नावरे (वय ५६) यांनी ही तक्रार दिली आहे. विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ (बदनामी), कलम ४९९ आणि ५०० (मानहानी) तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ई आणि ७२ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी ही खासगी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या रेकॉर्डिंगसाठी कोणतीही संमती देण्यात आली नव्हती. असे असतानाही विनोद कुलकर्णी यांनी या बैठकीचे गुपचूप रेकॉर्डिंग करून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप आहे. या अनधिकृत रेकॉर्डिंगचा आधार घेत कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि बदनामीकारक विधाने केली, असे तक्रारीत नमूद आहे. यामुळे आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावर गंभीर परिणाम झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. जळगाव सायबर गुन्हे शाखा या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करत आहे. या संदर्भात राजेश पांडे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अभिजात मराठी भाषेतील साहित्य संवर्धनाविषयी चर्चा अपेक्षित आहे. साहित्यप्रेमी मतदारांनाही याच प्रकारचा प्रचार अपेक्षित आहे. मात्र, विरोधक उणीदुणी काढत यात राजकारण आणत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *