पांढरा हत्ती पोसणे सुरू:बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघड; 2 वर्षांपासून एकही प्रसूती व कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया नाही!




वैजापूर तालुक्यातील बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्रात जनआरोग्य समितीच्या बैठकीत आरोग्य यंत्रणेचा अत्यंत भोंगळ आणि गंभीर कारभार उघडकीस आला आहे. तब्बल 36 गावे आणि 6 उपआरोग्य केंद्रांचा भार असलेल्या या आरोग्य केंद्रात गेल्या 2 वर्षांपासून एकही प्रसूती (बाळंतपण) तसेच एकही कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य समितीची बैठक जिल्हा परिषद सदस्य मनोज पाटील गायके आणि संगीताताई तांबे यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी बोरसर आणि परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रातील दुरवस्थेचा आणि गैरसोयींचा पाढाच समितीसमोर वाचला. आरोग्य कर्मचाऱ्यांना डिलिव्हरी करता येत नाही! बैठकीदरम्यान अत्यंत लज्जास्पद बाब समोर आली ती म्हणजे, या केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना डिलिव्हरी करता येत नाही! ही बाब खुद्द आरोग्य सेविकांनी बैठकीत मान्य केली. तसेच, या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नियम आणि गरजेनुसार MBBS वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक असताना, गेल्या 2 वर्षांपासून येथे एकही MBBS डॉक्टर उपलब्ध नाही. सध्या कार्यरत असलेल्या तिन्ही महिला अधिकारी BAMS पदवीधारक असून, त्यातील एक महिला अधिकारी गेल्या 1.5 वर्षांपासून प्रसूती रजेवर आहे. अपुरा व अप्रशिक्षित स्टाफ हेच आरोग्य सेवा ठप्प असण्याचे मुख्य कारण ठरले आहे. ऑपरेशन थिएटरमधील AC नादुरुस्त बैठकीत आरोग्य केंद्राच्या इतर समस्यांवरही प्रकाश टाकण्यात आला. येथील ऑपरेशन थिएटरमधील AC नादुरुस्त असून, निर्जंतुकीकरणाचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. पदाधिकाऱ्यांच्या कडक सूचना या गंभीर प्रकारावर जिल्हा परिषद सदस्य मनोज पाटील गायके, संगीताताई तांबे आणि पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. ऑपरेशन थिएटरमधील AC तातडीने दुरुस्त करून परिसर निर्जंतुक करावा, आरोग्य केंद्रात व परिसरात नियमित स्वच्छता ठेवावी आणि रुग्णांसाठी आवश्यक तो सर्व औषधसाठा तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशा कडक सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. 36 गावांतील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. तालुका आरोग्य अधिकारी काय म्हणाले? “हो, ही बाब खरी आहे की बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या 2 वर्षांपासून एकही डिलिव्हरी आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झालेली नाही. आता येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या असून, यापुढे आरोग्य केंद्रात प्रसूती व कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया नियमित सुरू करण्यात येतील.” — डॉ. नागेश सावरगावकर (तालुका आरोग्य अधिकारी) या बैठकीस पंचायत समिती सभापती वंदनाताई शिंदे, पं. स. सदस्या अर्चनाताई शेलार, राहुल शेळके, मिनाक्षीताई पवार, बाळू नाना पवार, माजी सरपंच अरविंद शेवाळे, अण्णा पाटील पवार, बाळासाहेब शेवाळे, नारायण बापू पवार, शिवाजी पवार, विशाल पवार, ग्रामपंचायत प्रशासक घुगे साहेब, विविध डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *