जुन्या मोंढा परिसरातील बेकायदेशीर पार्किंग व हातगाड्यांवर इतवारा पोलिसांची कारवाई; पाच जणांवर गुन्हा


नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील जुन्या मोंढा परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीररित्या हातगाडे उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच हातगाडे चालकांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 285 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जुन्या मोंढा परिसरातील मुख्य रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग व हातगाड्यांमुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याशिवाय रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारवाई करण्यात आली.

दि. १७ जुलै रोजी रात्री जुन्या मोंढा परिसरात विशेष मोहीम राबवून सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच हातगाडे चालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई इतवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक व गुन्हेशोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिक व वाहनचालकांना सार्वजनिक रस्त्यावर वाहने अथवा हातगाडे उभे न करता अधिकृत पार्किंगचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


Post Views: 471






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *