दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षा शुल्क माफ करा:युवक काँग्रेसची मागणी, मंडळाच्या सचिवांना निवेदन; भरलेले शुल्कही परत करा

[ads1]


पुणे: राज्यातील दुष्काळी आणि नैसर्गिक संकटांचा फटका बसलेल्या कुटुंबांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच शुल्क भरले आहे, त्यांना ते परत करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंडळाच्या सचिव मीनाक्षी राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले. सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये म्हणून परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय लवकर घेण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबाबत सविस्तर चर्चा झाली. या विषयावर राज्य परीक्षा मंडळाशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल, असे शिष्टमंडळाला सांगण्यात आले. यावेळी बोलताना शिवराज मोरे म्हणाले, “राज्यात जेव्हा-जेव्हा दुष्काळ किंवा मोठे नैसर्गिक संकट आले, तेव्हा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. आजही अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा अतिरिक्त भार टाकणे योग्य नाही. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क लवकर माफ करावे आणि ज्यांनी शुल्क भरले आहे त्यांना ते परत करावे. आर्थिक अडचणीमुळे एकाही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, ही आमची मागणी आहे.” या मागणीवर लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रदेश सरचिटणीस महेश म्हेत्रे, विश्वजीत जाधव, प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव प्रियांका चौधरी, ॲड. अनंत दासा आणि नितीन आंधळे भाविक राका उपस्थित होते.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *