पुणे येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. यावेळी शेकडो महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत संविधानाचा जागर केला. त्यांच्या हातात संविधान, कपाळी गंध आणि ओठांवर सावित्री-ज्योतिबांचा जयघोष होता. आयोजक विजय वडवेराव महात्मा फु
.
भिडेवाडाकार फुलेप्रेमी कवी आणि संविधानदूत विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०२६ पर्यंत नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात हा उत्सव रंगणार आहे. यामध्ये महाराष्ट्र तसेच देश-विदेशातून ८०० कवी, साहित्यिक, विचारवंत आणि कलाकार सहभागी झाले आहेत.
महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि फातिमाबी शेख यांच्या वेशभूषेतील कवी-कवयित्रींनी काव्यरचना सादर केल्या. फुले दाम्पत्याचा गौरवपूर्ण उल्लेख, त्यांच्या विचारांचा जागर, तसेच सावित्री-ज्योतिबांसह आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्याचा प्रचार-प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात देश-विदेशातील जवळपास आठशे कवींचा काव्य महोत्सव, ‘भिडेवाडा’ या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे आणि महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम होणार आहेत. लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी यांसारख्या देशांतून, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश आदी राज्यांतून कवी-कवयित्री सहभागी झाले आहेत.
विजय वडवेराव यांनी सांगितले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा त्याग, समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे. ही एक चळवळ असून, फुले विचार पुढील पिढीमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी कर्मठ व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, लोकांचा शिव्याशाप, चिखलफेक आणि शेणाचे गोळे अंगावर झेलले, त्या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अभियान राबवले जाणार आहे.

