![]()
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कुणीही एकत्र आले तरी त्याचा भाजप व महायुतीवर कोणताही परिणाम पडणार नाही. मुंबईत भाजपचाच महापौर बसेल, असा ठाम विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय युतीची घोषणा करणार आहेत. यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. विशेषतः ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलेल असाही दावा केला जात आहे. पण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हेटाळणीच्या सूरात कुणीही एकत्र आले तरी त्याचा भाजपला काहीही फरक पडणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
51 टक्के मुंबईकर भाजपला कौल देतील
चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विकासाचे मॉडेल लोकांपुढे मांडले आहे, त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नगरपालिका निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसले. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचे काम फडणवीसांनी केले. त्यांनी 2047 पर्यंत मुंबई कशी असेल? या आधारावर मुंबईचा विकास प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे मुंबईकर आपली 51 टक्के मते महायुतीच्या बाजूने देतील. त्यातून पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून भाजपचा महापौर मुंबईच्या गादीवर बसेल.
फडणवीसांनी मुंबईचा खरा विकास केला
ते पुढे म्हणाले, मुंबईकर कोण कुणाशी युती करतो याकडे लक्ष देत नाही. मुंबईकर विकासाच्या बाजूने आहेत. जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे दुसरीकडे, भकास आहे आणि आमच्याकडे विकास आहे. त्यामुळे कुणीही एकत्रित आले तरी त्यांना मते मिळणार नाही. तुमच्याकडे विकासाची भावना नाही. त्यांचा या शहरावर 25 वर्ष महापौर होता. तेव्हा त्यांनी या शहराच्या विकासाकडे लक्ष दिले नाही.
पण 2014 मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास झाला. जगातील कोणताही व्यक्ती इथे आला तर त्याला बदललेल्या मुंबईचा चेहरा दिसत आहे. जनतेला ठाकरेंची नौटंकी कळली
बावनकुळे यांनी यावेळी राज व उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुंबई शहराला विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. कितीही नेते एकत्र आले, गळाभेट घेतली तरी काहीही होणार नाही. जनता त्यांच्यापासून फार दूर गेली आहे. जनतेला त्यांची नौटंकी कळली आहे. त्यांनी कितीही भाषणातून नौटंकी केली, तर जनता विश्वास ठेवणार नाही. त्यांना फक्त विकासाचे व्हिजन मांडावे लागेल.
दरम्यान, महायुतीत बैठक सुरू आहे. आमच्यात कुठेही वाद नाही. महाराष्ट्रात सगळीकडे युती होणार आहे. बंडखोरी करणारा भाजपा-शिवसेनेचा कार्यकर्ता नाही. कुठल्याही परिस्थिती बंडखोरी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आमचा कार्यकर्ता समजूतदार आहे त्यामुळं बंडखोरी होणार नाही असंही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
