![]()
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुंढवा येथील जमीन प्रकरणात ही मागणी करण्यात आली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
.
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया आणि विजय कुंभार दोघेही आज बावधन पोलिस ठाण्यात पोहोचले होते. पार्थ पवार यांच्याविरोधात मिळालेल्या सगळ्या कागदपत्रांवरील प्रत्येक पानावर त्यांची सही आणि व्यवहारासंबंधी नोटरी आहे. यावरून पार्थ पवारांना कुणीच वाचवू शकत नाही. हे डॉक्युमेंट्स पोलिसांना देण्यासाठी आम्ही बावधन पोलिस ठाण्यात आलो. दरम्यान, ही कागदपत्रे १८ डिसेंबरला पोलिसांकडे गेले होते, मात्र अजुनपर्यंत काही होत नव्हते, म्हणून आज आम्ही तक्रार देण्यासाठी आलो, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.
पोलिसांची भेट घेतल्यानंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यात मुंढवा प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाल्या आहेत. याशिवाय, बावधन येथील एका प्रकरणात केवळ मुद्रांक शुल्क बुडवल्याची तक्रार आहे, ज्यात पुढे काही निष्पन्न होण्याची शक्यता कमी असल्याचे दमानिया यांनी सांगितले. त्यांनी पोलीस आयुक्त आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना या गुन्ह्याच्या स्वरूपाबाबत माहिती दिली असून, पोलिसांची कारवाई टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे नमूद केले.
दमानिया यांच्या मते, या गुन्ह्यात एकच एफआयआर आणि एकच तपास अधिकारी असणे आवश्यक आहे, अन्यथा तपास भरकटू शकतो. खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील आले नाहीत, तर पार्थ पवार कधी येणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिग्विजय पाटील यांची पोलिसांनी गोडीगुलाबीत चौकशी केल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्ष ही केस विसरून जाईल अशी अपेक्षा करत असल्याचे दमानिया म्हणाल्या.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए वारंवार अमेडिया कंपनीचे गुंड मुंढवा येथील जागा ताब्यात घेण्यासाठी गेले असताना त्यांच्या संपर्कात होते, असा दावा दमानिया यांनी केला. अजित पवार यांना जागा खरेदी करताना सर्व गोष्टींची माहिती होती, असेही त्यांनी म्हटले. मात्र, या चौकशीतून काही निष्पन्न होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दमानिया यांनी सिंचन घोटाळ्याचाही उल्लेख केला, ज्यात अजित पवार यांच्याविरोधात सर्व पुरावे दिले होते. तरीही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत शपथविधी केला, ही गोष्ट चुकीची होती, असे दमानिया म्हणाल्या. शीतल तेजवानी यांनी न्यायालयात अनेक खटले दाखल केले असल्याने खरी चौकशी होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
