![]()
राज्यातील 29 महापालिकांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणुका 2026 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होऊन 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 3
.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांची अधिकृत घोषणा न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील कुरबुरी उफाळून आल्याचे दिसत आहे. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने येण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका असून, येथे भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेमध्ये जागावाटपावरून अद्यापही खणाखणी सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर समन्वयाचे प्रयत्न सुरू असले तरी स्थानिक नेत्यांमधील मतभेद युतीच्या वाटचालीत अडथळा ठरत आहेत.
महाविकास आघाडीकडे पाहिले तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यातही अद्याप अंतिम चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यातच सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू असून, जागावाटपावरून झालेल्या चर्चांमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवडी परिसरातील तीन प्रभागांवरील वादावर तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये दोन जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला, तर एक जागा मनसेला देण्यावर सहमती झाल्याची माहिती आहे.
मात्र, सर्वच ठिकाणी हा समन्वय सहजसोप्या पद्धतीने होताना दिसत नाही. भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 114 वरून ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे समजते. काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद असल्याने, उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला आहे. अशा ठिकाणी थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून तोडगा काढला जात असल्याची माहिती आहे. या युतीकडे मुंबईसह राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, प्रत्यक्ष घोषणा झाली तर त्याचे पडसाद इतर महापालिकांवरही उमटण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ही युती राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकते, असे निरीक्षकांचे मत आहे.
राज्यातील राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर
दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. उमेदवारांकडून अर्ज भरण्याची तयारी सुरू असून, राजकीय पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाकडे लॉबिंग सुरू केले असून, काही ठिकाणी बंडखोरीची शक्यताही नाकारता येत नाही. युती आणि आघाड्यांच्या अंतिम घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, उमेदवार निवड, प्रचार रणनीती आणि स्थानिक प्रश्न या मुद्द्यांवरही चर्चा सुरू झाली आहे. अवघ्या काही आठवड्यांत होणाऱ्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर आले असून, महापालिकांचे निकाल आगामी विधानसभा राजकारणाची दिशा ठरवतील, असेही बोलले जात आहे.
