Crores of rupees embezzled in the name of stock market in Pune | पुण्यात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा: 10 घटनांमध्ये नागरिकांना 2.45 कोटींचा गंडा, खराडीतील नोकरदाराचे 38 लाख रुपये हडपले – Pune News



पुण्यात शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात फसवले आहे. गेल्या काही महिन्यांत अशा १० वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण २ कोटी ४५ लाख ११ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यातील बहुतां

.

खराडी येथील ५८ वर्षीय नोकरदार विभु माणिकलाल नाग यांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ३८ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १५ जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान घडला असून, याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चंदननगर परिसरातील ३३ वर्षीय सत्यतित महाकुट यांना शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाने ५ लाख ५१ हजार रुपयांना फसवले गेले. चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

७९ वर्षीय वृद्ध नागरिक अवतार सिंग यांना १७ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार ७ जुलै ते १ ऑक्टोबर दरम्यान घडला.

हडपसरमध्ये एका व्यक्तीला ३४ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याच परिसरात यासिन सय्यद यांना १९ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक झाली. यासिन यांच्या प्रकरणात १५ सप्टेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान हा घोटाळा घडला असून, काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कोंढवा येथील ४९ वर्षीय प्रशांत श्रीकांत गंभीर यांना शेअर ट्रेडिंगच्या नावाने २८ लाख २० हजार रुपयांना गंडा घातला गेला. हा प्रकार ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात घडला.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन प्रकरणे नोंदवली आहेत. ३६ वर्षीय अभिनंदन मधुकर जाधव यांना ६ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक झाली, तर ३७ वर्षीय सागर सदाशिव गायकवाड यांना ३० टक्के नफ्याच्या आमिषाने १० लाख ३३ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक ६७ वर्षीय बाळकृष्ण विनायक थिटे यांना इंटरनॅशनल शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळेल असे सांगून ३१ लाख ९७ हजार रुपयांना फसवले गेले. उत्थमनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल आहे.

शेवटची घटना आयपीओ खरेदीच्या नावाने घडली, ज्यात ३३ वर्षीय सोनू भारत भिडवे यांना ५२ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाली. ही तक्रार सायबर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली आहे.

पुणे शहरात शेअर मार्केट संबंधित सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. अज्ञात व्यक्तींकडून येणाऱ्या लिंक्स किंवा ॲप्सवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *