पुणे पुस्तक महोत्सवाला पहिल्या दोन दिवसांत (शनिवार-रविवार) दीड लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. या कालावधीत पुस्तकांच्या खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाल्याची माहिती मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली. यामध्ये युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय होत
.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी महोत्सवाचे जल्लोषपूर्ण वातावरणात उद्घाटन झाल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी सुमारे ७० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी हजेरी लावली, जी सहसा शेवटच्या दिवशी दिसते, असे संयोजकांनी सांगितले.
पांडे यांच्या माहितीनुसार, महोत्सवाच्या दोन्ही मंडपांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध विषयांवरील पुस्तके खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यामध्ये परदेशी नागरिकांचाही सहभाग होता. अनेक नागरिकांनी केवळ एकच पुस्तक न घेता, अधिक पुस्तके खरेदी करण्याला प्राधान्य दिले.
पुस्तकप्रेमींनी विविध दालनांना भेट देण्यासोबतच आपल्या पाल्यांना चिल्ड्रेन कॉर्नरची सफर घडवली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटला. पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकही महोत्सवाला आवर्जून भेट देत आहेत.
एनबीटीचा महोत्सव असल्याने पुस्तकांच्या खरेदीवर १० टक्के सवलत दिली जात आहे. तसेच, नामवंत प्रकाशकांकडूनही काही प्रमाणात सवलत मिळत आहे. यामुळे पुस्तक खरेदी-विक्रीच्या उलाढालीवर सकारात्मक परिणाम झाला असून, पहिल्या दोन दिवसांत कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. कोणत्या पुस्तकांची अधिक विक्री झाली आणि एकूण उलाढाल याबाबत सविस्तर माहिती महोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात दिली जाईल, असे राजेश पांडे यांनी नमूद केले.


