Hyundai EV | कार खरेदी करायचीये? जरा थांबा! ह्युंदाई आणतेय कमी बजेटमधील ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक गाडी

0
Hyundai.webp.webp


Hyundai EV | भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत आहेत. ह्युंदाई मोटर इंडिया (Hyundai Motor India) कंपनीने यंदाच सर्वसामान्य ग्राहकांसाठी परवडणारी इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. चेन्नई येथील उत्पादन केंद्रातून ही गाडी सादर केली जाणार असून, त्यामुळे कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे.

भारतीय वाहन बाजारात आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी ह्युंदाई मोटर इंडिया (Hyundai Motor India) या वर्षात दोन नवीन वाहन मॉडेल्स सादर करणार आहे. यामध्ये कंपनीच्या पहिल्या किफायतशीर इलेक्ट्रिक कारचाही समावेश असेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू (Tamil Nadu) राज्याला देशातील प्रमुख ईव्ही उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात स्पर्धा वाढण्यासोबतच ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.

कंपनीने स्थानिक उत्पादन वाढवण्यावरही विशेष भर दिला आहे. सध्या ईव्ही आणि पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये स्थानिक घटकांचा वाटा सुमारे 82 टक्के आहे. पुढील पाच ते सहा वर्षांत हा आकडा 90 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. स्थानिकीकरण वाढल्यास उत्पादन खर्च कमी होऊन वाहनांच्या किंमती अधिक स्पर्धात्मक होण्यास मदत मिळू शकते.

Hyundai EV | चार्जिंग सुविधा, रोजगार आणि गुंतवणुकीवर भर :

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग (Tarun Garg) यांनी सांगितले की, आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावर कंपनी लक्ष केंद्रित करत आहे. यामध्ये ईव्ही चार्जिंग नेटवर्कचा विस्तार तसेच आधुनिक वाहन तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती यांचा समावेश आहे. देशातील प्रमुख शहरे आणि राष्ट्रीय महामार्गांवर पुढील दोन ते तीन वर्षांत चार्जिंग सुविधा वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

याशिवाय, तमिळनाडूतील पुरवठादारांकडून होणाऱ्या खरेदीत सुमारे 4,000 कोटी रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 2,000 नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कंपनीने 2023 ते 2032 या कालावधीत तमिळनाडूमध्ये 26,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची बांधिलकीही कायम ठेवली आहे. हा उपक्रम एकूण 45,000 कोटी रुपयांच्या व्यापक गुंतवणूक योजनेचा भाग आहे. तसेच ह्युंदाई मोटर इंडिया आणि तमिळनाडू सरकार (Tamil Nadu Government) यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास कार्यक्रमही राबवला जाणार असून, त्याची अंमलबजावणी डिसेंबर 2027 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

News Title: Hyundai Affordable EV Launch India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *