यशवंत बँक घोटाळा प्रकरण:शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, कराड जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-05t191548941_1780667228.jpg




सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज आज कराड जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आता शेखर चरेगांवकर यास जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागणार आहेत. सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या यशवंत बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर त्यांनी जामीनाचा प्रयत्न केला होता, तो फेटाळण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, 112 कोटी रुपयांच्या यशवंत बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या खटल्याची सुनावणी कराडच्या पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्यासमोर सुरू होती. दोन दिवसांपूर्वी बचाव पक्षाचे वकील मुंदरगी यांनी युक्तिवाद करत खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या चुकीच्या प्रेस कॉन्फरन्समुळे ठेवीदारांनी बँकेतल्या ठेवी काढून घेतल्या. त्याचा फटका बँकेला बसल्याचे सांगितले. तसेच जी कर्जे काढली आहेत, त्यांच्या परतफेडीसाठी बँक 101 नुसार कर्जदारांवर कारवाई करत आहे. त्यामुळे चरेगांवकर यांना जामीन देण्यास हरकत नसावी, असा दावा करत मुंदरगी यांनी शेखर चरेगांवकर यांच्यावर केवळ राजकीय दबावापोटी हा खटला घालण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. हे मुद्दे खोडून काढताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जाधव यांनी सांगितले की, जर मेधा कुलकर्णी यांच्या प्रेस कॉन्फरन्स मुळे बँकेवर परिणाम झाला असेल आणि जर ती प्रेस कॉन्फरन्स खोटी होती, तर बँक किंवा चरेगांवकर यांनी खासदार कुलकर्णी यांच्याविरोधात आजपर्यंत मानहानीचा दावा का दाखल केला नाही? बोगस कर्ज प्रकरणे करून यशवंत बँकेचे अध्यक्ष तसेच संचालक मंडळाने त्यांच्यावर सर्वसामान्यांनी दाखवलेल्या विश्वासाला काळीमा फासण्याचे काम केले आहे. याचबरोबर कोणताही राजकीय दबाव या खटल्यामध्ये दिसून येत नाही. चरेगावकर यांच्याकडून अधिक माहिती तसेच ठेवीदारांच्या कष्टाने कमावलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी चरेगांवकर यांच्या जामीन नाकारण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली होती. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता पुढील जामीनासाठी चरेगांवकर यांना उच्च न्यायालयाकडे धाव घ्यावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *