Shreyas Iyer | श्रेयस अय्यरकडे टी-20 नेतृत्वाची धुरा? पहिलं टार्गेट कोण असणार

0
Shreyas-Iyer-1.webp.webp


Shreyas Iyer | भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे भारतीय पुरुष टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) स्तरावर झालेल्या चर्चेनंतर या निर्णयाला अंतिम स्वरूप दिले जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी आगामी मालिकांसाठी नेतृत्व बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी संघ निवडीसाठी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत श्रेयस अय्यर सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भविष्यातील कर्णधाराला संघ निवडीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे दीर्घकालीन नियोजनाचा भाग मानले जाते. त्यामुळे अय्यरकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

दरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या चर्चेनंतर युवा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) याला टी-20 संघाचा उपकर्णधार बनवण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे भारतीय संघात नेतृत्वाच्या पातळीवर पिढीबदलाची प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. युवा खेळाडूंना अधिक जबाबदारी देण्याच्या दिशेने निवडकर्ते पावले टाकत असल्याचे मानले जात आहे.

Shreyas Iyer | आयपीएलमधील कामगिरीने बदलले चित्र :

डिसेंबर 2023 नंतर श्रेयस अय्यर भारतीय टी-20 संघाबाहेर होता. मात्र, आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून खेळताना त्याने 498 धावांची दमदार खेळी केली. सातत्यपूर्ण फलंदाजी आणि प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा निवडकर्त्यांचा विश्वास संपादन केला. या कामगिरीमुळे त्याचे राष्ट्रीय संघात पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात असून, आता थेट कर्णधारपदासाठी त्याचे नाव चर्चेत आले आहे.

दुसरीकडे, सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडून नेतृत्व काढून घेण्याची शक्यता चर्चेत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला असला तरी स्पर्धेत त्याची वैयक्तिक फलंदाजी अपेक्षेइतकी प्रभावी ठरली नव्हती. त्याने नऊ सामन्यांत 242 धावा केल्या. तसेच आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून खेळताना त्याला केवळ 270 धावा करता आल्या आणि संघालाही नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे 2028 टी-20 विश्वचषकाचा विचार करून नव्या नेतृत्वावर भर दिला जात असल्याचे मानले जात आहे.

जर श्रेयस अय्यरला अधिकृतपणे कर्णधारपद मिळाले, तर त्याच्यासमोरील पहिली मोठी कसोटी 26 जूनपासून आयर्लंड (Ireland) विरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत असेल. या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंड (England) दौऱ्यावर जाणार असून तेथे पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. संघात संतुलन राखणे, युवा खेळाडूंना संधी देणे आणि 2028 विश्वचषकासाठी मजबूत संघबांधणी करणे हे अय्यरसमोरील प्रमुख उद्दिष्ट मानले जात आहे.

News Title: Shreyas Iyer Set For Captaincy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *