[ads1]
भावनगर (प्रतिनिधी) – भारतात कायदे आहेत, न्यायालये आहेत आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला (तो गुन्हेगार असला तरी) काही अधिकार दिले आहेत, असा गैरसमज बाळगणाऱ्या भाबड्या लोकांनो, आता डोळे उघडा! कारण गुजरातच्या भावनगर पोलिसांनी नुकताच झटपट न्याय देणारा एक अत्यंत यशस्वी आणि अभिनव उपक्रम राबवला आहे. न्यायालय, वकील, साक्षीदार आणि पुरावे या सगळ्या वेळखाऊ गोष्टींना फाटा देत, थेट रस्त्यावरच ऑन द स्पॉट निकाल कसा लावायचा, याचं एक ज्वलंत प्रात्यक्षिक भावनगर पोलिसांनी जगासमोर सादर केलं आहे.
गुन्हा काय होता? प्रथम आपण मुख्य प्रकरणाकडे वळूया, जेणेकरून पोलिसांच्या या अथक परिश्रमाची पार्श्वभूमी समजेल. कुंभारवाडा येथील रहिवासी असलेली काजल बेन ही तरुणी फैसल उर्फ खटकी रफीक भाई लखानी नावाच्या २० वर्षीय तरुणासोबत गेल्या ८ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. फैसल हा एसटी बस स्टँडजवळ फूटपाथवर राहत असे. ३ सप्टेंबर रोजी दुपारी काजल बेन बस स्टँडजवळ तिचा परिचित रवी उर्फ बडो गोहेल याच्याशी बोलत असताना फैसल तिथे पोहोचला. रागाच्या भरात त्याने काजल बेन आणि रवीला लाथ मारली, ज्यामुळे दोघे खाली पडले. यानंतर फैसलने काजल बेनचे केसे पकडून तिचे डोके, मान आणि चेहरा वारंवार जमिनीवरील टाईल्सवर आपटला. काजल बेन शुद्ध हरपल्यानंतर तो तिला रुग्णालयात घेऊन गेला, पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी या हत्येच्या आरोपीला अटक केली. इथपर्यंत सर्व काही कायद्याच्या चौकटीत सुरळीत चालले होते. पण खरा ट्विस्ट पुढे आहे.


गुन्ह्याची पुनर्रचना की लाठी-उत्सव? शनिवारी पोलीस महाशय आरोपी फैसलला घेऊन गुन्ह्याच्या घटनास्थळाची म्हणजेच एसटी बस स्टँडची पुनर्रचना करण्यासाठी गेले होते. पण कदाचित पोलिसांना वाटलं असावं की, नुसती पुनर्रचना करण्यात काय मजा? त्यापेक्षा थोडं मनोरंजक आणि रोमहर्षक काहीतरी करूया! मग काय, पोलिसांनी कायद्याची सर्व पुस्तके बाजूला ठेवून स्वतःच्या हातातील लाठ्यांचा वापर करायचे ठरवले.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांची जी हौस आणि कलाकारी दिसत आहे, ती खरोखरच थक्क करणारी आहे. आरोपी फैसलचे दोन्ही हात दोरीने बांधण्यात आले होते. तो वेदनेने विव्हळत जमिनीवर पडत होता, पण पोलिसांचा लाठी-यज्ञ सुरूच होता. एका व्हिडिओमध्ये तर त्याला थेट पोलिसांच्या जिप्सी गाडीच्या मागे बांधून लाठ्यांचा प्रसाद दिला जात होता. तर दुसऱ्या एका दृश्यात बस स्टँडच्या आत एका खांबाला बांधून त्याच्यावर डंडे बरसताना पोलीस दिसत आहेत.
भावनगरच्या या शूर पोलिसांनी मोजून १० मिनिटांत तब्बल १०७ वेळा लाठ्या चालवल्याचा आणि तब्बल १६० डंडे मारल्याचा दावा केला जात आहे. विचार करा, अवघ्या १० मिनिटांत १०७ वेळा! एवढी अचूकता आणि सातत्य तर ऑलिम्पिकमधील खेळाडूंमध्येही पाहायला मिळत नाही. आरोपी खाली पडला, वेदनेने तळमळला, तरीही पोलिसांच्या हातातील लाठ्या थांबल्या नाहीत. काय हा कर्तव्यदक्षपणा!
कायद्याचे नियम? ते फक्त कागदावरच चांगले दिसतात! आकाही मानवाधिकार कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ लगेच ओरड करू लागतील. गुजरातचे माजी प्रभारी डीजीपी डॉक्टर के. एल. एन. राव यांच्या कार्यकाळातील एका जुन्या लेखी आदेशाची आठवण करून देतील. या आदेशात स्पष्ट म्हटले होते की, कोणत्याही आरोपीला सार्वजनिक ठिकाणी फिरवून किंवा त्याच्याशी अपमानास्पद वागणूक देऊन त्याचे मानमर्दन करू नका; अन्यथा संबंधित पोलिसांवर कडक कारवाई होईल. पण भावनगर पोलिसांनी दाखवून दिले की, असल्या जुन्या कागदी आदेशांना थेट रद्दीच्या टोपलीत टाकणे किती सोपे असते. कायदा, मानवाधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम हे केवळ स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकात वाचण्यासाठी असतात, रस्त्यावरच्या खाकी न्यायदानात नाही!
न्यायालयांनी आता सुट्टी घ्यावी! भावनगरच्या या यशस्वी प्रयोगानंतर देशातील सर्व न्यायालयांनी आणि न्यायाधीशांनी आता कायमची सुट्टी घ्यावी, अशी नम्र विनंती करावीशी वाटते. कशाला उगीच सरकारी तिजोरीतून न्यायाधीशांचे पगार द्यायचे आणि न्यायालयात कोट्यवधी खटले वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवायचे? प्रत्येक पोलीस ठाण्याला काही मजबूत लाठ्या पुरवल्या की काम फत्ते! तोच वकील, तोच पोलीस आणि तोच न्यायाधीश! गुन्हेगार थेट जागेवरच दुरुस्त!
आरोपीवर हत्येचा अत्यंत गंभीर आणि क्रूर गुन्हा दाखल आहे, यात तीळमात्र शंका नाही. त्याला फाशी द्यायची की जन्मठेप, हे ठरवण्याचा अधिकार संविधानाने न्यायालयाला दिला आहे. पण भावनगरच्या या व्हिडिओने दाखवून दिले आहे की, पर्यंत पोलिसांच्या हातात लाठी आहे आणि रस्त्यावर कायदा चालवता येतोय, तोपर्यंत न्यायालयाची पायरी चढण्याची काय गरज? चला तर मग, भावनगर पोलिसांच्या या लाठी-कलेचे कौतुक करूया आणि आशा करूया की पुढील वेळी जेव्हा गुन्ह्याची पुनर्रचना होईल, तेव्हा पोलीस लाठ्यांचा नवा विक्रम प्रस्थापित करतील!
[ads2]
















Leave a Reply