मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला:आमदार उत्तमराव जानकर यांचा आरोप; धैर्यशील मोहिते पाटलांनी दिले सावध प्रत्युत्तर
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी सोलापूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहिते पाटलांवर केसाने गळा कापल्याचा आरोप केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत माझ्या मुलाची उमेदवारी फायनल झाली होती. पण नंतर घडलेल्या घडामोडीत मोहिते पाटलांनी आमचा केसाने गळा कापला, असे ते म्हणालेत. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत व शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीसाठी आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांनीही अर्ज दाखल केला होता. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जीवन जानकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. या पार्श्वभूमीवर आमदार उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटील यांच्यावर केसाने गळा कापल्याचा आरोप केला आहे. उत्तमराव जानकर नेमके काय म्हणाले? उत्तम जानकर म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत माझ्या मुलाची उमेदवारी फायनल करण्याचा निर्णय झाला होता. तशा बैठकाही झाल्या होत्या. सुरुवातीला ही निवडणूक मोहिते पाटलांनी लढावी अशा पद्धतीची चर्चा झाली होती. त्यानंतर माझे चिरंजीव जीवन जानकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 2 दिवसांच्या घडामोडीत माझ्या मुलाची उमेदवारी फायनलही झाली होती. त्यावर अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी स्वाक्षरीही केली. पण त्यानंतर 2 दिवसांतच वसंतराव देशमुख यांचा अर्ज भरणे हे आम्हाला खटकणारे होते. काल दुपारी 2 च्या सुमारास वसंतराव देशमुख फोन बंद करून नॉट रिचेबल झाले. एकप्रकारे मोहिते पाटलांनी माझा केसाने गळा कापला अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिली आहे. ज्याच्या मागे त्याच्या तालुक्यातील एकही मत नाही. त्याला मोहिते पाटलांनी उमेदवारी का दिली? हा प्रश्न आहे. आमदार अभिजीत पाटील व आमदार नारायण पाटील यांना मोहिते पाटलांच्या भूमिका पटत नव्हत्या. काल माझ्यासोबत त्यांनी घात केला. आम्हाला दगा दिला. हा दगा आम्हाला अपेक्षित नव्हता. या निवडणुकीत आम्ही वसंतराव देशमुख यांना मतदान करणार नाही, असे ते म्हणाले. हा आमच्या घरातील प्रश्न, घरातच सोडवणार – खासदार मोहिते दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या घटनाक्रमावर भाष्य केले आहे. तसेच हा आमच्या घरातील प्रश्न असल्याचे नमूद करत त्यावर घरातच तोडगा काढण्याची भूमिकाही विषद केली आहे. हा आमच्या घरातील प्रश्न आहे. हा प्रश्न आम्ही घरात बसूनच संपवू. इथे प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी आहे. मी घरातला विषय चव्हाट्यावर मांडत नाही ही माझी पद्धत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे उत्तमराव जानकर यांच्या मोहिते पाटलांवरील टीकेमुळे शरद पवार गटातील अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत या घटनाक्रमाचा फायदा भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना होणार हे स्पष्ट झाले आहे.
