निदा खान प्रकरणात माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर:टीसीएस धर्मांतर प्रकरणाचा तपासात चौकशीची नोटीस येणार?

0
2-photo-21_1780650333.png




राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक महत्त्वाचे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची विशेष तपास पथकाकडून आतापर्यंत 3 वेळा सखोल चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची चर्चा असून, याच पार्श्वभूमीवर माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संवेदनशील प्रकरणात एसआयटीने आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींविरोधात न्यायालयात मुख्य दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक पुरावे तपासण्यात आले. त्यातून समोर आलेल्या नव्या माहितीच्या आधारे पोलिस लवकरच न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आणखी वेगाने पुढे सरकत असून अनेक नवीन बाबी समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, निदा खानला राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेले मतीन पटेल यांनी मात्र माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव या प्रकरणात जोडले जात असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आणि आधारहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणात राजकीय रंग दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. निदा खानशी आपला संबंध कसा आला, याबाबत स्पष्टीकरण देताना मतीन पटेल म्हणाले की, तिची वैयक्तिक ओळख त्यांना पूर्वी नव्हती. तिचे आई-वडील काही कौटुंबिक अडचणी घेऊन त्यांच्याकडे आले होते. निदा खान गर्भवती असल्याने मानवी दृष्टिकोनातून तिच्या राहण्याची व्यवस्था करण्यात मदत केली. त्यामागे कोणताही गैर हेतू नव्हता आणि आपण कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सर्व कॉल रेकॉर्ड्स तपास यंत्रणांकडे उपलब्ध – मतीन पटेल याचबरोबर इम्तियाज जलील यांना या प्रकरणात विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही मतीन पटेल यांनी म्हटले आहे. इम्तियाज जलील हे आपले राजकीय नेते असून त्यांच्याशी झालेल्या फोनवरील चर्चा केवळ राजकीय किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या होत्या, असे त्यांनी सांगितले. निदा खान प्रकरणासंदर्भात कोणताही संवाद झालेला नसल्याचा दावा करत सर्व कॉल रेकॉर्ड्स तपास यंत्रणांकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, एसआयटीच्या हाती लागलेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा बदलत असल्याने इम्तियाज जलील यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी पाचारण केले जाते का, याकडे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *