पंचशील नगर परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा:अतिरिक्त पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
![]()
शहरात मुबलक पाणी असून शहरवासीयांना एक दिवसाआड भरपूर पाणी मिळत असताना, शहराचाच एक भाग असलेल्या प्रभाग क्र. १० मधील पंचशील नगरात उंचीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दररोज अतिरिक्त एक तास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे. सोबतच मागणी मान्य न झाल्यास इतर भागातील पाणीपुरवठा रोखण्याचा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे. शहरात इतर ठिकाणी नियमित पाणीपुरवठा होत असताना पंचशील नगरात उंचीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र वणवण करावी लागत आहे. सध्या मजीप्राकडून फारच कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच वरील भागात पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला पाण्याचा दाब कमी असतो. जेव्हा पाणी पूर्ण दाबाने येण्यास सुरुवात होते, तोवर पाणीपुरवठा बंद होण्याची वेळ झालेली असते. या समस्येमुळे अनेक नागरिकांना पाण्याच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. आता यावर जीवन प्राधिकरण विभाग काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे निवेदन सादर करताना भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष सुधीर थोरात, नगरसेवक विनोद तानवेस, प्रकाश सरदार, महेंद्र रावेकर, प्रशांत मेश्राम, कपिल खंडारे, राजेश सदानशिवे, संदीप खंदारे, कपिल खंदारे, आशिष गोंडाने, संदीप कंधारे, अजय रामटेके उपस्थित होते.
