ओबीसींचे 12 जूनला राज्यव्यापी आंदोलन:ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांची घोषणा, सरकारला अल्टिमेटम
![]()
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांना वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी प्रकाश शेंडगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकार आणि मराठा आंदोलकांवर गंभीर आरोप केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणातील तब्बल ९० टक्के जागांवर कुणबी समाजाच्या नावाने बोगस दाखले काढून जागा हडप केल्या गेल्याचा दावा त्यांनी केला. मंत्रिमंडळ उपसमितीने राजीनामा देण्याची मागणी ‘मराठा समाजाला २५ हजार कोटी दिले जातात, मग पावणेचारशे जमाती असलेल्या ओबीसींना निधीच्या समान वाटपाचे दिलेले वचन का पाळले नाही?” असा सवाल करत शेंडगे म्हणाले की, मंत्रिमंडळ उपसमितीने तात्काळ राजीनामा देऊन नवीन उपसमिती स्थापन करावी.
