नीट पेपरफुटीविरोधात मनसेचे आंदोलन:संभाजीनगरमध्ये आरसीसी क्लासेसवर धडक, क्लास पाडला बंद; फी परत देण्याची मागणी
![]()
देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालेली असतानाच, आता या प्रकरणाचे पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटले आहेत. पेपरफुटीच्या चौकशीत नाव समोर आलेले ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील आरसीसी क्लासेसवर धडक देऊन कामकाज बंद पाडले. पेपरफुटीच्या मानसिक तणावातून ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याप्रकरणी शिवराज मोटेगावकर आणि इतर संबंधित आरोपींवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. “ज्या संस्थेच्या संचालकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू दिला जाणार नाही,” अशी भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. विद्यार्थ्यांची फी तात्काळ परत करा अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मनसेकडे तक्रारी केल्या आहेत की, क्लासेसची फी भरलेली असल्याने त्यांना तिथेच शिक्षण सुरू ठेवण्याचा दबाव टाकला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने क्लास व्यवस्थापनाला जाब विचारला. ज्या विद्यार्थ्यांना या संस्थेत शिकण्याची इच्छा नाही, त्यांची भरलेली फी विनाविलंब परत करावी, अन्यथा क्लासेस पुन्हा सुरू होऊ देणार नाही, असा सज्जड दम मनसेने दिला आहे. मनसेच्या प्रमुख मागण्या अविश्वासाचे वातावरण पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत क्लासेस सुरू ठेवणे ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासन आणि क्लास संचालक काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
