भंडाऱ्यात एफडीएची मोठी कारवाई:मधुमेह, हृदयरोग त्वरित बरे करण्याचा दावा अंगलट, दोन दुकानातून 30 हजारांचा माल जप्त
![]()
भंडारा शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन औषध प्रतिष्ठानांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 29 हजार 792 रुपये किमतीचा आक्षेपार्ह औषध साठा जप्त करण्यात आला. ‘औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा, 1954’ चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, भंडारा यांच्या पथकाने 3 जून 2026 रोजी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी केली. मे. श्री लक्ष्मी आयुर्वेद औषधालय (राम मंदिर रोड, बडा बाजार, भंडारा) आणि पतंजली चिकित्सालय व औषधी भंडार स्टोअर्स (मे. अविशा इंटरप्राईजेस) (राजीव गांधी चौक, भंडारा) या दोन प्रतिष्ठानांवर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान, विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण 15 औषधांवर आक्षेपार्ह मजकूर आणि जाहिरात आढळून आली. पहिल्या प्रतिष्ठानातून 12,180 रुपयांचा, तर दुसऱ्या (पतंजली) प्रतिष्ठानातून 17,612 रुपयांचा औषध साठा कायदेशीर पंचनामा करून जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या औषधांच्या वेष्टनावर मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, नेत्ररोग, गलगंड, महिला व पुरुषांमधील लैंगिक समस्या आणि वजन कमी करणे यांसारख्या गंभीर आजारांवर त्वरित गुण येईल, असा मजकूर छापण्यात आला होता. कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय असे खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. जप्त केलेल्या औषधांमध्ये पतंजलीचे कारेला जामुन ज्यूस, दृष्टी आय ड्रॉप्स, आय ग्रीट आय ड्रॉप्स, हृदयम्रीत वटी, कांचनार घनवटी यांसह शक्तीपुंज टॅबलेट्स, श्वेत प्रदरान्तक कॅप्सूल आणि सुंदरी सुधा सिरप यांसारख्या 15 औषधांचा समावेश आहे. या संदर्भात सहाय्यक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, भंडारा, श्रीमती शहनाज ताजी यांनी सांगितले की, ‘आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाच्या औषध उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. जनतेच्या आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही.’ त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचे सेवन करू नये. औषधांच्या दर्जाबाबत किंवा आक्षेपार्ह जाहिरातीबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा.
