पुण्यात 'व्हिनस आर्टफेस्ट'चा कलाविष्कार:कलेच्या सान्निध्यात राहिल्याने आत्मविश्वास वाढतो- आमदार शिरोळे
![]()
शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते घोले रोडवरील राजा रविवर्मा गॅलरीमध्ये ‘व्हिनस आर्टफेस्ट 2026’ या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आजच्या एआय आणि स्पर्धेच्या युगात कलेला खूप महत्त्व असून, कलेच्या माध्यमातून समाजात ओळख निर्माण करणे सहजशक्य असल्याचे मत आमदार शिरोळे यांनी यावेळी व्यक्त केले. व्हिनस ट्रेडर्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध श्रेणीतील चित्रांचा समावेश आहे. 2013 पासून व्हिनस ट्रेडर्सकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध कार्टूनिस्ट चारुहास पंडित आणि व्हिनस ट्रेडर्सचे संचालक सुरेंद्र करमचंदानी यांची उपस्थिती होती. आमदार शिरोळे म्हणाले की, चित्रकार होण्याची माझी खूप इच्छा होती आणि त्यासाठी मी कोर्सही केले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहून चित्रकला करण्याची माझी अजूनही इच्छा आहे. कलेमध्ये अद्भुत शक्ती असून, तिच्या सान्निध्यात राहिल्याने आत्मविश्वास वाढण्यास निश्चितपणे मदत होते. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्यातील कलागुण जोपासण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. कलेमुळे समाजात वेगळी ओळख निर्माण होते आणि त्याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीमत्त्वावर होतो. कलेचे सातत्य राखल्यास त्याचे चांगले फायदे होतात आणि व्यक्तीमत्त्व घडवण्यात तिचा मोठा वाटा असतो. प्रदर्शनात सहभागी झालेल्या कलाकारांनी चित्र समाधी लावून काढल्याचे चारुहास पंडित यांनी नमूद केले. सार्वजनिक जीवनात कलेला मोठे महत्त्व असल्याचे ते म्हणाले. कलेमुळे नव्या पिढीवर चांगले संस्कार होत असून त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. सध्याची तरुण पिढी कलेच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करत असल्याने भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे पंडित यांनी सांगितले. या प्रदर्शनादरम्यान 13 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजता एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये या परीक्षांचे महत्त्व, तयारीची दिशा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्यांचा होणारा उपयोग याबाबत तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. तसेच, 14 जून रोजी “युनिक पुणे ट्री पेंटिंग” हा सामूहिक कलाउपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये अभ्यागत, कलाकार आणि कला रसिक एकत्रितपणे सहभागी होऊन पुण्याच्या सर्जनशीलतेचे आणि सामूहिक सहभागाचे प्रतीक असलेली भव्य कलाकृती साकारणार आहेत.
