गुजरातमध्ये मुंबई पोलिसांच्या छाप्यात 74 कोटींचा ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त:ड्रग्ज माफियांविरोधात साकीनाका पोलिसांची थेट राज्याच्या सीमेपार कारवाई
![]()
राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला तोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता थेट आंतरराज्य सीमा ओलांडून आक्रमक पवित्रा घेतला आहे. साकीनाका पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात धाड टाकत ७४ कोटी ७६ लाख रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांना मोठा दणका बसला असून मुंबईतील पुरवठा साखळीचा मुख्य दुवा तुटला आहे. या प्रकरणाची सुरुवात २१ एप्रिल २०२६ रोजी अंधेरीतून झाली. अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर मुस्कान समीर खान (वय २६) हिला १०९ ग्रॅम मेफेड्रॉनसह ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे केलेल्या सखोल चौकशीतून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्या आधारे पोलिसांनी २६ एप्रिल रोजी वजूळ कमर अबुल वफा चौधरी ऊर्फ पप्पू (वय ५६) याला शिळफाटा येथून अटक केली. कारवाईत २०.०४० किलो लिक्विड मेफेड्रॉनसह ड्रग्ज निर्मितीचे रसायने जप्त केली. माफियांचे कंबरडे मोडले सध्या तस्कर पोलिसांची नजर चुकवण्यासाठी मोठ्या शहरांऐवजी सीमेवरील राज्यांत छोटे कारखाने थाटण्यावर भर देत आहेत. मात्र, साकीनाका पोलिसांची ही कारवाई दर्शवते की, मुंबई पोलिस आता थेट उत्पादनाचे मूळ केंद्र शोधण्यावर भर देत आहेत. या आंतरराज्य कारवाईमुळे अमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले असून, मुंबई पोलिसांकौतुक होत आहे. मुंबई, अन्य शहरात तस्करी पप्पूच्या चौकशीतून गुजरात कनेक्शन समोर आले. त्याने नर्मदा जिल्ह्यातील वरखड गावात घर भाड्याने घेऊन तिथे गुपचूपपणे एमडी ड्रग्जचा कारखाना थाटला होता. या कारखान्यातून मुंबईसह इतर शहरांत अमली पदार्थांची तस्करी केली जात होती. साकीनाका पोलिसांनी माहितीच्या आधारे छापा टाकत ड्रग्ज व रसायनांचा साठा जप्त केला. तेलंगणातही ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, ६ कोटींचा ऐवज जप्त मुंबई | मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-४ ने थेट तेलंगणातील जहिराबाद येथे छापा टाकून आंतरराज्य एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुख्य आरोपी नसिर शेख याने संगारेड्डी जिल्ह्यातील पिचारगडी तांडा येथे दोन एकरांच्या फार्म हाऊसवर हा कारखाना थाटला होता. तेथे छापा टाकून पोलिसांनी ६ कोटी २२ लाख रुपये किमतीची २२९३ लिटर घातक रसायने आणि प्रयोगशाळेचे साहित्य जप्त केले. या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण २० कोटी ७२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईची पाळेमुळे एप्रिल महिन्यात मिरारोडमध्ये घडलेल्या एका गुन्ह्यात आहेत. ४ एप्रिल २०२६ रोजी नयानगर, मिरारोड येथील ‘छेडा आदर्श बिल्डिंग’मधील एका घरातून पोलिसांनी २ लाख ६६ हजार रुपये किमतीचे १३४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात फिरदोस अरबाज कुरेशी आणि तिचा पती अरबाज वकील कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर मुंबई, ठाण्यातून १५ आरोपींना अटक करत १३.६५ कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि रसायन जप्त केले होते. चौकशीतून या ड्रग्ज रॅकेटचे मुख्य केंद्र तेलंगणात असल्याचे समोर आले.
