संभाजीनगर पोलिस आयुक्तांची फसवणूक करू पाहणारे तोतये ‘सीआयडीबी’ जेरबंद:तिघांना अटक, गळ्यातील आयकार्डच्या लेसमुळे आली शंका

0
orig_new-project-2026-06-03t065311393_1780449864.jpg




“आम्ही सीआयडीबी टीमचे राष्ट्रीय अधिकारी आहोत. पोलिसांना क्लिष्ट प्रकरणांत मदत करू’ असे सांगत पोलिसांनाच फसवू पाहणाऱ्या एका महिलेसह तिघांना स्वत: पोलिस आयुक्तांनी गजाआड केले. विशेष म्हणजे, हे तोतये अधिकारी पोलिस आयुक्तांनाच भेटायला गेले होते. मात्र, आयुक्तांच्या तीक्ष्ण नजरेने त्यांची तोतयेगिरी उघड झाली. याप्रकरणी या तिघा तोतयांसह त्यांना पोलिसांसारखी बनावट ओळखपत्रे पुरवणाऱ्या दिल्ली-हरिद्वार येथील संस्थेच्या चालकाविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद इशरत नूर अली (३६, रा. देवळाई परिसर), लक्ष्मण संतोष दिवसे (४०, रा. जयभवानीनगर) आणि शेख तहर शेख इब्राहिम (४५, रा. नूतन कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. सोमवारी (१ जून) दुपारी दीडच्या सुमारास तिन्ही आरोपी रिक्षाने थेट पोलिस आयुक्तालयात आले. सीआयडी अधिकारी असल्याच्या थाटात ते थेट पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. आयुक्तांच्या दालनाजवळ नागरिकांना भेटण्यासाठी भेट कक्ष (व्हिजिटर रूम) आहे. नेहमीप्रमाणे पोलिस आयुक्त नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या कक्षात आले होते. आयुक्तांची नजर त्या लेसवर; शंकेची सुई आयुक्त नागरिकांशी संवाद साधत असताना हे तोतया त्यांच्या डाव्या बाजूला बसले. त्यांच्या गळ्यात पोलिस विभागासारखीच लाल आणि निळ्या रंगाची ओळखपत्रे होती. पोलिस आयुक्तांचे लक्ष त्यांच्या गळ्यातील आयकार्डच्या लेसवर गेले. त्यावर ‘सीआयडीबी’ असे लिहिलेले होते. आयुक्तांना संशय आल्याने थेट, “तुमचे आयकार्ड दाखवा,” असे फर्मावले. आयुक्तांनी कार्डची पाहणी केली असता, त्यावर इंग्रजीत ‘Crime Investigation Detective B’, आणि ‘अपराध व भ्रष्टाचार विरोधी राष्ट्रीय संघटन’ (भारत सरकार मान्यताप्राप्त) असे छापलेले होते. हा प्रकार बोगस असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गुन्हे शाखेच्या पोलिसांना तिथे बोलावून या तिघांनाही ताब्यात दिले. या तिघांना अशा प्रकारची हुबेहूब पोलिसांसारखी बनावट ओळखपत्रे देऊन त्यांची नेमणूक करणाऱ्या निर्बल बस्ती, शिवालिक नगर, हरिद्वार (उत्तराखंड) आणि ग्रेटर नोएडा, नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयाच्या चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *