ग्रामीण पोलिसांचे गावठी दारू अड्ड्यांवर धाडसत्र:मोर्शीत 4 लाख 30 हजार, तर माहुलीत 19 हजारांचे साहित्य नष्ट

0
be8c1adb-5b7c-4e57-ba4b-07165f5ff343_1780503358385.jpg




मोर्शी आणि माहुली जहागीर पोलिसांनी बुधवार, ३ जून रोजी गावठी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी दारू, मोहा सडवा आणि संबंधित साहित्य जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले. मोर्शी येथे ४ लाख ३० हजार रुपयांचा, तर माहुली जहागीर येथे १९ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. मोर्शी पोलिसांनी मध्यप्रदेशातील मुलताई ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासोद चौकी येथील पोलिसांशी समन्वय साधला. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सालबर्डी, घोडदेव आणि झुनकार गावांजवळील जंगलात नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत २० ड्रम मोहा सडवा आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कारवाई मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दुसऱ्या एका कारवाईत, माहुली जहागीर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह नांदुरा पिंगळाई येथील पारधी बेड्यावरील एका महिलेच्या घरातील गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या ठिकाणी गावठी दारू, मोहा सडवा आणि अन्य साहित्य असा १९ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. माहुली जहागीरचे ठाणेदार श्रीकांत कडू आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवले जात आहे. या दोन्ही ठिकाणच्या कारवाईमुळे ग्रामीण भागातील अवैध धंदे करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *